Breaking News

आरोपांचे संमेलन

वर्षभरापासून ज्याची तयारी सुरू असते अशा साहित्य संमेलनाचे आयोजन उत्तमरीतीने पार पडले म्हणून आयोजकांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली असेल, पण वादंग रूपानेच अधिक समोर आलेल्या यंदाच्या संमलेनाने मराठी साहित्याचे आणि संस्कृतीचे काय भले झाले हा संशोधनाचा विषय आहे. साहित्यिकांचा व विचारवंतांचा मेळा भरणे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. सर्व साहित्यप्रेमी या सोहळ्याकडे उत्सुकतेने पाहात असतात. पण, ‘येथे हे काय सुरू आहे’, अशा संभ्रमात साहित्यरसिकांना लोटण्याची परंपरा याही वर्षीच्या संमेलनाने पार पाडली असेच खेदाने म्हणावे लागेल. नेहमीचेच साहित्यबाह्य वाद तसेच पूर्णत: राजकीय संदर्भातील आरोप-प्रत्यारोप यांच्या गदारोळाने गाजलेल्या 94व्या साहित्य संमेलनाचा अखेर समारोप झाला. गोदावरीच्या काठी जमलेला सारस्वतांचा मेळा पांगला आहे. अखेरच्या दिवसापर्यंत रंगलेल्या मानापमानाच्या कलगीतुर्‍यांची सांगता झाली असून गोदावरीच्या तीरावरती पुन्हा एकदा सामान्य माणसाच्या मनाला हवीहवीशी वाटणारी शांतता परतली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या साहित्य संमेलनाबद्दल शुभेच्छाच व्यक्त केल्या होत्या, पण संमेलनाला मात्र केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधाचे व्यासपीठ असल्याचे स्वरुपच येत गेले. मुळात स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये हे संमेलन आयोजित होत असूनही त्यांचे नाव देण्यावरून ज्या प्रकारचा वाद या ठिकाणी झाला तो सावरकरांविषयी प्रेम आणि आदर बाळगणार्‍या प्रत्येक मराठी मनाला निश्चितच खटकला असेल. सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान तर सर्वज्ञातच आहे, परंतु सावरकर हे काही निव्वळ राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हते. भारतीय जनता पक्षाचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि पत्रकार संमेलनाचेदेखील अध्यक्ष होते. सावरकर लेखक होते, कवी होते, आत्मकथाकार होते. सर्व प्रकारच्या साहित्यकृतींची रचना त्यांनी केली आणि त्यांचे साहित्य रसिकांच्या मनात आजही आपले स्थान टिकवून आहे. असे असूनही नाव देण्यावरून त्यांच्याच गावात त्यांची उपेक्षा केली जावी हे निश्चितच दुर्दैवी आहे. कविवर्य कुसुमाग्रजांविषयी तर प्रत्येक मराठी साहित्यप्रेमीच्या मनात नितांत आदरच आहे, परंतु निव्वळ सावरकरांचे नाव दिले जाऊ नये म्हणून कुसुमाग्रजांचे नाव देणे यातून दोघांचाही अनादरच होतो आणि फडणवीस यांनी याबाबत व्यक्त केलेला निषेध योग्यच आहे, परंतु त्यापुढेही एकंदर राजकीय आरोप-प्रत्यारोपांसाठीच जणू या संपूर्ण साहित्य संमेलनाचा वापर करण्यात आला. मुळात ज्यांना संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान दिला त्यांच्या अनुपस्थितीविषयी मंचावरून टीका-टिप्पणी करून संमेलनाच्या आयोजकांनी मर्यादा ओलांडली. पुढे मग कुठल्याच बाबतीत औचित्य पाळण्याचे भान दिसून आले नाही. सरसकटपणे साहित्य व्यवहार बाजूला पडले, दुय्यम ठरले आणि त्यांची जागा वारेमाप राजकीय भाषणांनी घेतली. हे साहित्य संमेलन होते की एखाद्या राजकीय पक्षाचे अधिवेशन असा प्रश्न कुणाला पडल्यास वावगे ठरणार नाही. मग साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी मंडळी असावीत का नसावीत याची वांझोटी चर्चा वर्षानुवर्षे आपण कशासाठी बरे करीत आलो आहोत? आता पुढील संमेलन उदगीर येथे होणार आहे. निदान तेव्हा तरी संमेलनाच्या मंचावर राजकीय नेत्यांपेक्षा साहित्यिक अधिक दिसतील अशी अपेक्षा आहे.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply