महाड, अलिबाग ः प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अलौकिक होते. 17व्या शतकात त्यांनी दूरदृष्टी दाखवत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. आज 21व्या शतकातही त्यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी ठरतेय. त्यामुळे किल्ले रायगडला भेट देणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. आज या किल्ल्याची केलेली यात्रा मी तीर्थक्षेत्र मानतो, असे उद्गार देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी (दि. 6) काढले. राष्ट्रपतींनी ऐतिहासिक किल्ले रायगडाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, छत्रपती खा सदार संभाजीराजे, खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भरत गोगावले, अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे आदी या वेळी उपस्थित होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद सहकुटुंब किल्ले रायगडावर आले होते. पत्नी सविता आणि मुलगी स्वाती त्यांच्यासोबत होती. हे सर्व सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पाचाड येथे हेलिकॉप्टरने दाखल झाले. या ठिकाणाहून विशेष वाहनाने राष्ट्रपती व कुटुंबीय रोप वेकडे गेले. तेथू न किल्ल्यावर पोहचले.
रायगडावर राष्ट्रपतींसाठी विशेष बग्गीची व्यवस्था करण्यात आली होती. होळीचा माळ ते जगदिश्वर मंदिर या अंतरात बग्गीचा वापर करण्यात आला. राष्ट्रपतींनी या वेळी राजसदर, होळीचा माळ, जगदिश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी भेट दिली. त्यांनी शिवरायांच्या समाधीस्थळाला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. राष्ट्रपतींनी येथे आयोजित एका पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांच्या हस्ते दोन पुस्तकांचे तसेच रायगडावर आधारित माहितीपटाचे प्रकाशन करण्यात आले.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …