Breaking News

टीम इंडियाचा ‘विराट’ विजय

द्रविडच्या मार्गदर्शनाखाली मुंबई कसोटीत न्यूझीलंडवर मात
मुंबई ः प्रतिनिधी
मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या कसोटी मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात भारताने न्यूझीलंडला तब्बल 372 धावांनी नमवले. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडला दुसर्‍या डावात 167 धावांत गुंडाळले आणि कसोटीतील सर्वांत मोठा विजय नावावर केला. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहलीचा हा पहिला विजय ठरला.

न्यूझीलंडला पहिल्या डावात अवघ्या 62 धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने 7 बाद 276 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. या घोषणेसह भारताने न्यूझीलंडला 540 धावांचे लक्ष्य दिले, पण पाहुण्यांना हे आव्हान पेलवले नाही. या विजयासह भारताने ही मालिका 1-0 अशी जिंकली आहे. सोबतच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत 12 गुणांची कमाई केली. याआधी भारताने 2015मध्ये दिल्लीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 337 धावांनी विजय नोंदवला होता. मयांक अग्रवालला सामनावीर, तर रविचंद्रन अश्विनला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने कप्तान टॉम लॅथमला (6) स्वस्तात बाद करीत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर अश्विनने विल यंग (20) आणि रॉस टेलर (6) यांनाही तंबूत मार्ग दाखवत न्यूझीलंडची अवस्था खिळखिळी केली. 3 बाद 55 अशी धावसंख्या असताना डॅरिल मिशेलने किल्ला लढवला. त्याला हेन्री निकोल्सची साथ लाभली. या दोघांनी संघाचे शतक पूर्ण केले. विराटने अक्षर पटेलला चेंडू सोपवला आणि अक्षरने मिशेलला जयंत यादवकरवी झेलबाद करीत ही भागीदारी मोडली. मिशेलने सात चौकार आणि दोन षटकारांसह 60 धावा केल्या. मिशेलनंतर आलेला यष्टीरक्षक टॉम ब्लंडेल खातेही न उघडता धावबाद झाला. 129 धावांत न्यूझीलंडने पाच फलंदाज गमावले. चौथ्या दिवशी जयंत यादवने रचिन रवींद्रला (18) पुजाराकरवी झेलबाद करीत न्यूझीलंडला सहावा धक्का दिला. त्यानंतर पुढच्या पाच धावांत न्यूझीलंडने आपले चारही फलंदाज गमावले आणि त्यांचा दुसरा डाव 56.3 षटकात 167 धावांत संपुष्टात आला. फिरकीपटू जयंत यादव आणि अश्विनने प्रत्येकी चार बळी घेतले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply