ओमायक्रॉन विषयीची जागतिक भीतीची लाट काहीशी अनाठायीच असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झपाट्याने होतो हे खरे असले, तरी त्याची घातकता नगण्य असल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. साध्यासोप्या भाषेत सांगायचे झाले तर गेला महिनाभर ओमायक्रॉनचा गवगवा जगभर होत आहे, परंतु त्यामुळे कुठल्याही देशात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. अर्थात असे असले तरी काळजी घेण्याची गरज आहेच. कारण याच विषाणूचे पुढील उत्परिवर्तन प्राणघातक ठरू शकते.
कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूप्रकाराच्या दहशतीने अवघे जग हादरून जाणे साहजिकच होते. या विषाणूचे वर्तन आणि प्रसार नेमका कसा होतो याबद्दल विज्ञान जगतात देखील बरीचशी अनभिज्ञता असल्यामुळे जगभर घबराट उडाली. ज्या दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमायक्रॉनचा प्रादूर्भाव सर्वप्रथम आढळला, तेथे कडक निर्बंध लादण्यात आले. ओमायक्रॉनचा संसर्ग डेल्टा विषाणूपेक्षा 30 पट अधिक वेगाने पसरतो हे कळल्यानंतर बहुतेक देशांनी दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, इस्वातिनी या लगतच्या देशांतील प्रवाशांना इतरत्र प्रवास करण्यास मज्जाव केला. भारताने देखील ओमायक्रॉनच्या भीतीने आपली नियमावली बदलली, परंतु ओमायक्रॉन हा कोरोना विषाणूचा व्हेरिएंट किंवा प्रकार सुपरमाइल्ड अर्थात अतिशय सौम्य असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केल्यानंतर बर्याच देशांनी आता दक्षिण आफ्रिकन प्रवाशांवरील निर्बंध उठवण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. दक्षिण आफ्रिका हा देश बव्हंशी पर्यटन आणि खाणकाम या दोन उद्योगांवर अवलंबून असतो. ओमायक्रॉनच्या प्रसारामुळे या देशाची आधीच डबघाईला आलेली अर्थव्यवस्था पुरती जमीनदोस्त होण्याचा धोका होता. याचाच विचार करून अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांनी ओमायक्रॉनची भीती न बाळगण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारने देखील भारतीय नागरिकांना घाबरून जाण्याचे कारण नसल्याचा निर्वाळा दिला आहे. महाराष्ट्रात मात्र निर्बंधांचे चित्र संभ्रमाचेच दिसते. कधी काय बंद होईल हे सांगता येत नसल्यामुळे मुंबई-पुण्यासारख्या शहरांतील नागरिक हवालदिल झाल्याचे चित्र आहे. कोरोनाचे निमित्त पुढे करून महाविकास आघाडी सरकारकडून विकासकामे बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. आपल्याला जे जमले नाही त्याचे खापर केंद्र सरकारवर फोडायचे आणि कोरोनाची भीती दाखवून उरलेली कामे देखील बंद ठेवायची हा मविआ सरकारचा खाक्या राहिला आहे. सरकारच्या या दुर्लौकिकामुळेच महाराष्ट्रातील व्यापारीवर्ग आत्मविश्वास गमावून बसल्यासारखा झाला आहे. बंगाल आणि गुजरातचे मुख्यमंत्री सत्ताधारी आघाडीच्या नाकावर टिच्चून मुंबईत येतात आणि येथील उद्योजकांना आपापल्या राज्यात येण्याचे निमंत्रण देतात. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देखील चांगला मिळतो. हे पाहून महाविकास आघाडी सरकारला खरे तर आत्मचिंतन करण्याची गरज आहे, परंतु तसे काही होण्याची शक्यता दिसत नाही. कारण या आघाडीला रस आहे तो खुर्ची टिकवण्याच्या राजकारणात. महाराष्ट्राच्या जनतेची त्यांना काहीही पडलेली नाही. ओमायक्रॉन विषाणूचा धोका ओळखून सावधगिरीने पावले उचलणे वेगळे आणि ओमायक्रॉनचे निमित्त पुढे करून जनतेची कामे बंद करणे वेगळे. दुसर्या प्रकारच्या निरुद्योगीपणात महाविकास आघाडी सरकार एव्हाना तज्ज्ञ झाले आहे. दोन वर्षे न केलेल्या कामांबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेणार्या पानभर जाहिराती प्रसिद्ध केल्या की काम भागते, असे आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत.