जगभरातील परिस्थिती पाहता केंद्र सरकारने मास्कच्या वापराबाबत जनतेमध्ये आलेल्या ढिलाईकडे लक्ष वेधले आहे. राज्य सरकारांनी नव्या कोरोना हॉटस्पॉट्सकडे बारकाईने लक्ष ठेवावे असेही केंद्राने म्हटले आहे. देशात शुक्रवारी 8503 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली. आरोग्य यंत्रणांशी सल्लामसलत करून कोरोनाच्या निरनिराळ्या विषाणू प्रकारांचा सामना करण्यासाठी बूस्टर डोसची आवश्यकता आहे का, याचा निर्णय घ्यावा अशी शिफारस संबंधित संसदीय समितीने केली आहे. बूस्टर डोससंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांमध्येच मतमतांतरे असल्यामुळे अद्याप यासंदर्भात निर्णय होऊ शकलेला नाही.
येत्या काही आठवड्यांत युरोपात कोविड-19मुळे होणारे मृत्यू तसेच रुग्णालयांत व आयसीयुमध्ये दाखल होणार्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत राहील असा इशारा युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेंशन अँड कंट्रोलने नुकताच दिला आहे. एकंदर 19 युरोपीय देशांमध्ये मिळून एव्हाना जवळपास तीनशेच्या आसपास ओमायक्रॉन रुग्णांची नोंद एव्हाना झाली आहे. लसीकरणाचे प्रमाण अद्यापही पुरेसे नसल्याने युरोपात ओमायक्रॉनचा फैलाव वेगाने होण्याची भीती या संस्थेने व्यक्त केली आहे. दरम्यान दक्षिण कोरियातही महामारीच्या काळातील आजवरची सर्वाधिक गंभीर परिस्थिती दिसते आहे. सलग तिसर्या दिवशी त्या देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या 7 हजाराच्या पुढे दिसून आली. तेथील सरकारने नोव्हेंबरपासून कोरोना निर्बंध कमालीचे सैल केले होते. आपल्याकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसर्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, तिसर्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक, चौथ्या टप्प्यात सहव्याधी असलेले रुग्ण, पाचव्या टप्प्यात 45 ते 59 वयोगटातील नागरिक आणि सहाव्या टप्प्यात 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. केंद्र सरकार आणि निरनिराळी राज्य सरकारे देशात वेगाने लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असले तरी विशेषत: ग्रामीण भागांत विशिष्ट भागांमध्ये लसीकरणाला वेग येऊ शकलेला नाही. महाराष्ट्रातही मुंबई-पुण्यात लसीकरण प्रभावी रीतीने पार पडले असले तरी पुरेसा प्रतिसाद न मिळालेले काही जिल्हे महाराष्ट्रातही आहेतच. बुस्टर डोसची मागणी करत सतत केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याऐवजी राज्यातील सत्ताधारी आघाडीने या जिल्ह्यांमध्ये आधी दोन डोस पूर्ण करून घेण्याकडेही लक्ष दिले पाहिजे. केंद्रानेही तशीच भूमिका जाहीर केली आहे. लसीकरणास पात्र नागरिकांपैकी 86 टक्के जनतेने पहिला डोस घेतला आहे. आणि 100 टक्के लसीकरण लवकरात लवकर पार पडावे अशी केंद्राची इच्छा आहे असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान शुक्रवारी महाराष्ट्रातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 17 झाली. यात तीन जण मुंबईचे तर चार पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील आहेत. ओमायक्रॉनमुळे आजाराची सौम्य बाधा होत असली तरी त्यासंदर्भात अद्याप आणखी माहिती जमा होण्याची आवश्यकता आहे. त्याचा वेगाने होणारा फैलाव आणि जगभरातील भीतीचे वातावरण यांमुळे श्रीमंत देशांकडून पुन्हा एकदा लशींची साठेबाजी होण्याची शक्यताही दाट आहे. तसे झाल्यास गरीब व विकसनशील देशांमध्ये लसींचा तुटवडा जाणवू शकतो. एकंदर परिस्थिती पाहता नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे आदी कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचे पूर्वी इतकेच काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला पुन्हा एकदा कठोर निर्बंधांकडे जायचे नसल्यास आपण ही खबरदारी घ्यायलाच हवी.