नवी दिल्ली : वृत्तसंस्था
‘अमर रहे अमर रहे बिपीन रावत अमर रहे’, ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’, ‘जब तक सूरज चांद रहेगा, बिपीनजी का नाम रहेगा’ अशा घोषणा देत शुक्रवारी (दि. 10) देशाच्या संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यासह पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावरही दिल्लीच्या ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सीडीएस बिपीन रावत यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आल्यावर त्यांना 17 तोफांची सलामी देऊन गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर मंत्रोच्चारात लष्करी इतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कन्या कृतिका आणि तारिणी यांनी आपल्या मात्या-पित्यांना मुखाग्नी दिला. या वेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
रावत यांच्या अंत्ययात्रेत देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख सहभागी झाले होते. त्यांनी रावत यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्कारासाठी हजारो लोक जमले होते. दिल्ली आणि आजपासच्या राज्यातूनही लोक तिरंगा घेऊन आले होते, तसेच श्रीलंका, भूतान, नेपाळ आणि बांगलादेशातील सैन्याचे कमांडरही या वीर योद्ध्याला अखेरची सलामी देण्यासाठी जमले होते.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …