आज एका वेगळ्या विषयावर लिहीत आहे. 27 डिसेंबरला सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज संकुलात एका भव्य इमारतीचे लोकार्पण होत आहे.
50 वर्षांपूर्वी रयत शिक्षण संस्थेमध्ये ‘कमवा आणि शिका’ या योजनेत पदवीधर झालेले, नंतर शिक्षक झालेले, नंतर व्यावसायिक झालेले, नंतर राजकारणात आलेले, पण राजकारण अंगाला चिकटवून न घेतलेले, व्यवसायात सचोेटीने आर्थिक यश मिळवलेले, पण पाय जमिनीवर असलेले… रामशेठ ठाकूर यांनी ही इमारत ‘रयत’ला बांधून दिली आहे. त्यासाठी 6 कोटी 27 लाख रुपये त्यांनी खर्च केले आहेत. आनंदाने केलेले आहेत. जे केले त्याचे त्यांना फार समाधान आहे. अशी थोडी माणसं असतात, जी समाजाकरिता जगतात. समाजाकरिता केलेल्या कामात आनंद मानतात. रामशेठ त्यामधले आहेत. त्यांना घरातील सर्व कुटुंबीयांचीही तेवढीच साथ आहे.
महाराष्ट्राचं मोठेपण नेमकं कशात आहे? असा प्रश्न माझ्या मनात हे लिहिताना आला आणि त्याचं उत्तरही लगेच समोर आलं. महाराष्ट्राचं मोठेपण ‘महाराष्ट्र’ या नावातच आहे. हे राज्य खरंच महान आहे. हे एकमेव राज्य असं आहे ज्याच्या शब्दात ‘राष्ट्र’ही आहे आणि या महानतेची सुरुवात ‘रयत’मध्ये आहे. या शब्दाचा पहिला उच्चार या जगातला सर्वांत मोठा राजा… जो रयतेचा राजा होता त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे. सिंहासनावर बसलेला, पण रयतेसाठी बसलेला असा तो राजा होता. तीच महाराष्ट्राची परंपरा. रयतेला मोठं मानणारी, पुरोगामीत्वाची. छत्रपती शिवाजी महाराजांनी ती सुरू केली. छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे ती चालवली. त्याचा सामाजिक अर्थ महात्मा फुले, भीमराव ऊर्फ बाबासाहेब आंबेडकर, टिळक, आगरकर यांनी महाराष्ट्राला सांगितला. त्यात राजकीय आणि सामाजिक परंपरा आली. त्यामुळेच या महाराष्ट्रात सत्तेच्या पदावर बसलेलेच मोठे असं न मानता समाजासाठी सर्वस्व झोकून काम करणारे आदरणीय ठरले, वंदनीय ठरले. त्यात विनोबा होते. पंजाबराव देशमुख होते, स्वामी रामानंद तीर्थ होते, शिवाजीराव पटवर्धन होते, बाबा आमटेही होते आणि कर्मवीर भाऊरावही होते. ही परंपरा यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि आता शरद पवार. इथपर्यंत रयतेची ही परंपरा सुरू आहे. महाराष्ट्र त्यात अग्रभागी आहे.
त्यामुळेच सत्तेच्या पदापेक्षा सामाजिक काम करणार्या संस्थांची पदं या नेत्यांनी धन्य मानली. सहज आठवलं… महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणसाहेब 1961 साली रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाले. त्या दिवशी त्यांचे डोळे डबडबले होते. भाषण ‘मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, त्यादिवशी मला जेवढा आनंद झाला नव्हता त्यापेक्षा कितीतरी पट मला आज आनंद वाटतो आहे, कारण कर्मवीर अण्णांनी एक-एक रुपया जमा करून ग्रामीण भागातल्या मुलांना शिकवण्यासाठी जिवाचा आटापिटा केलेला आहे. त्या संस्थेचा मी अध्यक्ष झालो आहे. अण्णांच्यामुळे ग्रामीण भागातील मुले शिकू शकली. ही रयतेची मुलं आहेत आणि ती आता जगाच्या स्पर्धेत उभी आहेत. तेव्हा हे पद मुख्यमंत्रीपदापेक्षा मोठं आहे.’…
आज यशवंतरावांचं ते भाषण आठवत आहे. पदावर बसलेली माणसं मोठी आहेतच. त्यात यशवंतरावही आहेत, वसंतदादा आहेत, शरदराव आहेत, पण ती माणसे जेव्हा पदावर नव्हती तेव्हाही मोठीच होती आणि आजही शरदराव पवार थेट सत्तेच्या पदावर नसताना मोठेच आहेत. महाराष्ट्र हे नाव त्यामुळेच सार्थ होते आणि त्या नावातला ‘राष्ट्र’ हा शब्द अधिक मोठा होतो.
आज हे सर्व सांगण्याचं कारण रामशेठ ठाकूर यांनी सातार्यात रयत शिक्षण संस्थेला बांधून दिलेली इमारत, त्यासाठी खर्च केलेले 6 कोटी 27 लाख. 50 वर्षांपूर्वी 340 रुपये पगारावरचा एक शिक्षक व्यवसायातील मोठ्या यशानंतर सामाजिक जाणिवा कायम ठेवतो. आपलं साधेपण जपतो. नाव ‘रामशेठ’ असलं, तरी वागण्यात ‘शेठ’ कुठे दिसत नाही. पायात साधी चप्पल आहे. पाय आणि विचार जमिनीवर आहेत, सहज सांगतात… ‘मी काय घेऊन आलो होतो, काय घेऊन जाणार आहे?…’ आत्मज्ञानाची ही भाषा आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेत सगळ्याच संतांची याच आत्मज्ञानाच्या भाषेने त्यांच्या मोठेपणाची सुरुवात झाली होती. गोरा कुंभार असंच म्हणाला होता… ‘मी एवढी मडकी बनवतो, पण माझं मडकं कच्चं की पक्कं…’ सावताही असंच म्हणाला… ‘मी बागेतले तण उपटतो, पण माझ्या मनातील अविचाराचे तण मी उपटतो का?’… मी रामशेठशी ही तुलना करीत नाही, पण एका शिक्षकाने कष्टाने उभ्या केलेल्या व्यवसायातून समाजाकरिता कोट्यवधी रुपये हसत, आनंदाने द्यावेत आणि स्वतःला धन्य मानावं. याला आत्मज्ञान आणि आत्मभान या शब्दाखेरीज काय
म्हणता येईल?
50 वर्षांपूर्वी महिन्याला 340 रुपये पगार घेणारा शिक्षक, व्यवसायात उतरून 10 हजार रुपये पणाला लावतो, त्यात दोन हजार रुपये मिळवतो. इथून सुरुवात होते. समाजाला विसरत नाही आणि बघता-बघता व्यवसायातल्या यशाबरोबर शिक्षणसंस्था उभ्या करतो… पनवेलचे सी.के.टी. महाविद्यालय असो, खारघरचे महाविद्यालय असो, उलव्याची नव्याने बांधलेली शकुंतला विद्यालयाची प्रचंड इमारत असो… लाखो रुपये किमतीचं उलवा नोडमधलं स्वतःच्या मालकीचं अद्ययावत क्रीडासंकुल करून ते रामशेठ तरुण मुलांना खेळायला उपलब्ध करून देतात. तिथे जाऊन उभे राहतात. शेकडो झाडं लावून घेतात. मुलांना खेळायला साहित्य देण्यापासून सगळी मदत करतात… एक-एक दिवस रामशेठसोबत काढला की त्यांच्या जीवनशैलीचे आत्मभान जागे झालेले असे अनेक पैलू समोर येतात. घरी पोहचतात तेव्हा घर भरलेलं असतं, गर्दी असते, अनेक पालक बसलेले असतात. ‘मुलांची फी माफ करून द्या’ म्हणतात. रामशेठ किती मुलांच्या फीज माफ करतात याचा हिशोब नाही.
अशा किती शिक्षण संस्था त्यांनी उभ्या केल्या. सर्व जातीधर्माची मुलं-मुली शिकताहेत आणि रामशेठ त्यात खूष आहेत. ही खुशी, हा आनंद हेच आत्मभान आहे. त्यांनी ठरवलं असतं तर या देशातल्या सगळ्यात महागड्या असलेल्या मर्सिडीस, बीएमडब्ल्यू गाड्यांंची एजन्सी घेऊन पनवेल, नवी मुंबईत शोरूम उघडून लाखो रुपये ते कमवू शकले असते. त्यांचा आनंद पैसे कमविण्यात नाही. जे मिळवले ते चांगल्या कामासाठी वाटण्यात आहे. या सामाजिक आनंदात ते खूश आहेत. राजकारणात ते फार रमले नाहीत, रमणारही नाहीत. दोनदा खासदार झाले, लोकसभेत पोहचले. एकदा दि. बा. पाटील यांना पराभूत करून आणि बॅ. अंतुले यांना पराभूत करून, पण त्यांच्याविषयीचा अत्यंतिक आदर त्यांच्या मनात आजही आहे. नवी मुंबई विमानतळाला दि.बां.चं नाव द्यावे यासाठी लाखोंच्या मोर्चात रामशेठच आघाडीवर होते. 1999 साली वाजपेयींचं सरकार एका मतानं पडलं, ते मत रामशेठ यांचंच होतं. त्यांनी ते मत सरकारच्या बाजूने द्यावं म्हणून त्यांना केंद्रिय मंत्रिपद आणि अजून काय काय मिळवता आलं असतं…, पण रामशेठ तत्त्वाचा माणूस आहे. पदाची त्यांना हाव नाही. त्यामुळेच 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही त्यांची भूमिका आहे, त्यामुळे या कृतज्ञ नेत्याने रयत शिक्षण संस्थेला सातार्यात कॉलेजसाठी जागा कमी पडते आहे, असं दिसल्यावर स्वतः इमारत बांधून दिली. रामशेठ यांच्या या उदारपणाला तेवढाच न्याय ‘रयत’च्या मॅनेजिंग कौन्सिलने दिला. रामशेठच्या ध्यानी-मनी नसताना या इमारतीला ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’ हे नाव द्यायचा ठराव ‘रयत’चे अध्यक्ष शरद पवार यांनीच मांडला. डॉ. अनिल पाटील म्हणाले, ‘आमच्या मनाप्रमाणे झालं…’ रामशेठ तयार नव्हते. ते प्रसिद्धीसाठी काही करत नाहीत, तो त्यांचा स्वभाव नाही…
सहज आठवण झाली… रामशेठच्या जन्मगावी गेलो होतो. न्हावेखाडी… उलव्याचा समुद्र जिथे सुरू होतो ते गाव. उधाण आलं की रामशेठच्या घरापर्यंत पाणी यायचं. त्या गावातल्या छोट्या घरात रामशेठचा जन्म झाला. आज ते छोटं घर त्यांनी तसंच ठेवलं आहे. आई-वडिलांचा भव्य फोटो लावला आहे. जुन्या घरात आणि नव्या घरातसुद्धा. त्या जुन्या घरात पाचव्या वर्षी आईला चुलीच्या जळणासाठी लाकडं फोडून देण्याचं काम राम करत होता. आई त्याच्या हातात पाटी-पेन्सिल देत होती. आज 65 वर्षांनंतर रामचा रामशेठ झाला. हजारो मातांच्या मुलांना या रामशेठने शिक्षणासाठी पूर्ण इमारत बांधून दिली आहे, तीसुद्धा सातार्यात.
आई-वडील, सासरे जनार्दन भगत यांचे संस्कार हे पुरोगामी संस्कार होते. त्याच संस्काराने रामशेठ मोठे होत गेले. पवारसाहेबांनी त्यांना नेमकं हेरलं आणि ‘रयत’च्या मॅनेजिंग कौन्सिलवर घेतलं. पवारसाहेब आज 40 संस्थांचे अध्यक्ष आहेत आणि या सर्व संस्थांचं पवारसाहेबांनी ‘संस्थान’ होऊ दिलेलं नाही, कारण प्रत्येक संस्थेत रामशेठसारखी समर्पणाने काम करणारी माणसं आहेत. एक उदाहरण सांगून थांबतो.
20 वर्षांपूर्वीची गोष्ट. ‘रयत’चे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे होते. संगणकीय युग सुरू झालं होतं. ‘रयत’च्या सर्व शाळा आणि महाविद्यालयात संगणक शिक्षण देणे गरजेचं होतं. विवेक सावंतांकडून रावसाहेबांनी खर्चाचा प्रस्ताव घेतला. 12 कोटी खर्च होता. पवारसाहेबांना प्रस्ताव सादर केला. पवारसाहेबांनी बैठक बोलावली. 12 लोकांना बोलावलं. बैठक सुरू झाली, चहा मागवला… त्यात 5 मिनिटं गेली. राहिलेल्या 7 मिनिटांत 12 जणांना सांगितलं… ‘तुम्ही एक-एक कोटी रुपये द्या… सुरुवात रामशेठपासून झाली, मग पतंगराव कदम, 7 मिनिटांत 12 कोटी जमले…’ अशी ही कर्मवीरांची रयत शिक्षण संस्था आज देशातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आहे. साडेपाच लाख विद्यार्थी शिकत आहेत, 15 हजार प्राध्यापक आहेत. अनिल पाटील कार्याध्यक्ष आहेत, ते कर्मवीरांचे नातू. त्या शिक्षण संस्थेत रामशेठ शिकले, ते ॠण विसरले नाहीत. ॠण न विसरणारे असे किती लोक असतील?, अशा या रामशेठच्या कर्तृत्वावर काय लिहावं? त्यांच्या या कामापुढे सत्तेची पदं खूप छोटी वाटतात, रामशेठ मोठे वाटतात. पवारसाहेबांना अशी माणसं बरोबर माहिती आहेत. पवारसाहेबांएवढा मोठा माणूस देशात आहे तरी कोण? पदावर बसलेला माणूस मोठा नसतो, पदावर नसतानाही माणसं मोठी असतात. रामशेठ तुमच्या अभिनंदनाला शब्द कमी पडतायत… तुम्ही कोणत्याच शब्दात मावत नाही… तुमच्यासाठी एकच शब्द आहे…
‘रामशेठ’
तुमच्या नावात ‘राम’ आहे आणि ‘शेठ’ शब्दातला उद्दामपणा अजिबात नाही.
विंदा करंदीकरांच्या कवितेत एका शब्दाचा बदल करून सांगतो.
देता, देता इतुके द्यावे…
देणार्याने ‘रामशेठ’ व्हावे…
– मधुकर भावे, ज्येष्ठ पत्रकार