Breaking News

कोरोनाविरुद्ध आणखी एक पाऊल

देशात कोविड-19 विषाणूनंतर आता नवा उत्प्रेरक ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी नवनव्या नियमावली लागू होत असताना दुसरीकडे सातत्याने उपाययोजनाही केल्या जात आहेत. नागरिक सुरक्षित राहणे ही त्यामागची भावना आहे. ज्येष्ठ, प्रौढ आणि 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होऊन देशाने मोठा टप्पा गाठल्यानंतर मुलांना कोरोनावरील लस कधी दिली जाणार याचे उत्तर अखेर सर्वांना मिळाले आहे. देशातील 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. मोठ्या कालावधीनंतर शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू झाली आहेत. गेली जवळपास पावणे दोन वर्षे विद्यासंकुले बंद असल्याने लॉकडाऊन काळापासून मुले घरूनच ऑनलाइन शिक्षण घेत होती, तर बहुतांश परीक्षा थेट रद्द कराव्या लागल्या. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होऊन सारे काही पूर्वपदावर आले असताना शाळांची घंटा वाजली. टप्प्याटप्प्याने वर्ग भरू लागले. पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गांनाही परवानगी मिळाल्यानंतर हे वर्गही भरून विद्यार्थ्यांचा किलबिलाट पुन्हा झाला, पण शाळा सुरू झाल्या तोच कोरोना काही ठिकाणी डोके वर काढू लागला. नवी मुंबईतील घणसोली येथील एका शाळेत 18 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले, तसेच नगर जिल्ह्यातील एका शाळेतही 19 विद्यार्थी व शिक्षक असे कोरोनाचे 20 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. अशा प्रकारे काही शाळांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने पालकांची धास्ती वाढली असतानाच आता देशभरात ओमायक्रॉनचेही रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे बहुतांश पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास अनुत्सुक आहेत. या पालकांना दिलासा देणारी बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. त्यांनी 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या किशोरवयीन मुलांच्या लसीकरण मोहिमेस 3 जानेवारी रोजी प्रारंभ होईल. यासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी करता येणार आहे. या वयोगटानंतर पुढच्या टप्प्याचे नियोजन केले जाऊ शकते. लसीकरणाच्या विस्ताराबरोबरच आरोग्यसेवेतील, आघाडीवर राहून काम करणारे कर्मचारी आणि 60 वर्षांवरील व्याधीग्रस्तांना बूस्टर डोस देण्याचे पंतप्रधान मोदींनी जाहीर केले आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग थांबलेला नसल्याने दोन लसींपाठोपाठ बूस्टर डोसही दिला जात आहे. या डोसमुळे शरीरात मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक अँण्टीबॉडीज तयार होण्यास मदत मिळते. आता भारतातही 10 जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येईल. बूस्टर डोससाठीची प्रक्रिया अगदी आधी सारखीच असेल. जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि तुम्ही लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, दुसरा डोस आणि तुम्ही नोंदणी करीत असलेल्या दिवसातील अंतर 9 महिन्यांपेक्षा (39 आठवडे) जास्त असेल तर तुम्ही बूस्टर डोससाठी पात्र आहात. बूस्टर डोससाठी व्याधीग्रस्तांना डॉक्टरचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. एकंदर लसीकरणाचा विस्तार वाढत असताना मोदी सरकारने बूस्टर डोसद्वारे देशातील नागरिकांना कोरोनापासून अधिक सुरक्षित करण्याचा निर्धार केला आहे.

Check Also

कर्मवीर अण्णांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

सातारा : रामप्रहर वृत्त आशिया खंडातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक …

Leave a Reply