Breaking News

रायगडात देशी व विदेशी पाहुणे दाखल

हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे पक्षी निरीक्षक व पर्यटक सुखावले आहेत.

सद्यस्थितीत सुमारे 22 ते 25 हजार किलोमीटरचा प्रवास करून अमुर ससाणे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात दाखल झाले आहेत. पक्षी अभ्यासक राम मुंडे यांना या भागात जवळपास 30 ते 35 अमुर ससाणे दिसून आले आहेत. या भागात एमआयडीसी असल्याने येथे उंचच उंच लाईटचे टॉवर आहेत आणि या टॉवरच्या तारेवर सकाळ व संध्याकाळच्या वेळेला अमुर ससाणे थव्याने बसलेले दिसून येत होते. वाढलेल्या गवतावरील किडे, कीटक, छोटे पक्षी यांची शिकार करून आपली उपजीविका भागवणारे हे शिकारी पक्षी जवळपास पंधरा दिवस या भागात मुक्कामासाठी होते. दोन दिवसापूर्वी ते स्थलांतर करून पुढे निघून गेले आहेत. अद्यापही एखादा अमुर ससाणा या भागात दिसून येतो. याबरोबरच ऑर्च बिल्लीयड फ्लायकॅचर, ठिपकेवाला तुतारी, काळ्या डोक्याचे भारीट व हिमालयन बुलबुल व इतरही देशी व विदेशी प्रवाशी व स्थलांतरित पक्षी जिल्ह्याच्या विविध भागात दाखल झाले आहेत.

अमुर ससाणा

अमूर ससाणा हा एक स्थलांतरित शिकारी पक्षी असून तो महिन्याभरात जवळपास 22 ते 25 हजार किलोमीटरचा प्रवास करतो. तो मुळात रशियामधल्या सायबेरिया क्षेत्रातील निवासी आहे. रशिया आणि चीन या देशांची नैसर्गिक सीमा म्हणजे अमुर नावाची नदी. या नदीच्या नावावरून या पक्षाचे नाव अमुर ससाणा असे पडले आहे. अमुर नदीच्या भागातच या पक्षाचे प्रजनन होते. परंतु नोव्हेंबर महिन्यात बर्फ पडण्याच्या अगोदर हा पक्षी आपल्या उपजीविकेसाठी प्रवास करण्यास सुरुवात करतो. तो अमुरहुन चीनमार्गे भारतात दाखल दाखल होतो. भारतात याचा मुक्काम काही महिने असतो. भारतातील विविध भागातून ते नागालँड राज्यात हजारोंच्या संख्येने एकत्र येतात आणि काही दिवस तेथे मुक्काम करून आफ्रिकेत निघून जातात. पाच दिवसात तो पाच हजार सहाशे किलोमीटरचा प्रवास करतो. एवढा प्रवास हा पक्षी कमी दिवसात कसा करू शकतो हे पक्षीतज्ञांना पडलेले कोडं आहे.

हिमालयन बुलबुल (कळारश्ररूरप र्इीश्रर्लीश्र)

मुळात हिमालयात वास्तव्यात असणारे हे पक्षी सध्या स्थलांतर करून रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. माणगाव तालुक्यातील पाटणूस, ताम्हिणी घाटाच्या पायथ्याशी हे पक्षी सध्या थव्याने उडताना दिसून येत आहेत. थंडीच्या दिवसात हिमालयात बर्फ पडत असल्याने हे पक्षी आपल्याकडे स्थलांतरित होतात.

विशिष्ट आवाजामुळे हिमालयन बुलबुल हे पक्षी लक्ष वेधून घेतात. विविध झाडांची फळे कीटक फुलांमधील मकरंद खाताना ते पक्षी निरीक्षकांना दिसून येत आहेत. संपूर्ण काळया रंगाचे शरीर असणार्‍या हिमालयन बुलबुल या पक्ष्याचे पाय व चोच लाल रंगाची असते. थंडी कमी झाली की, ते पुन्हा स्थलांतर करून परतीच्या प्रवासाला लागतात.

ऑर्च बिल्लीयड फ्लायकॅचर (जीलहश-लशश्रश्रळशव षश्रूलरींलहशी)

हा पक्षी आकाराने अगदी लहान असतो. दाट झाडी वेली आणि करवंदीच्या जाळ्यामध्ये पाण्याच्या जवळ इतर कीटक पकडणार्‍या पक्षांबरोबर हा सध्या दिसून येत आहे. या पक्षाला कॅमेर्‍यात कैद करणे फार कठीण काम आहे. कारण तो प्रचंड वेगाने हालचाल करत कीटक पकडणारा पक्षी आहे. हा पक्षी दक्षिण मेक्सिकोपासून अँडीजच्या पूर्वेपर्यंत दक्षिण ब्राझीलपासून त्रिनिदादपर्यंत या भागात आढळणारा पक्षी आहे.

ठिपकेवाला तुतारी (ुेेव  ीरपवळिशिी)

ठिपकेवाला तुतारी हा पक्षी थंडीच्या दिवसात नदीच्या पात्रात पाणथळ जागेत, शेतात साठलेल्या पाण्यात जल कीटक, आळ्या, शंख-शिंपले खातांना दिसून येतो. हा पक्षी मुळात युरोपमधील सबआर्टिक आर्द्र प्रदेशातला. तो आफ्रिका, दक्षिण आशियामार्गे भारतात स्थलांतर करून येतो आणि थंडीचे दिवस संपले की, परतीच्या प्रवासाला लागतो.

काळ्या डोक्याचे भारीट पक्षी (लश्ररलज्ञ हशरवशव  र्लीपींळपस)

गवताळ प्रदेशात गवतावरील बीया खड्ड्यामध्ये भात झोडणीनंतर राहिलेले धान्य खाण्यासाठी काळ्या डोक्याचे भारीट हे पक्षी सध्या रायगडात दिसून येत आहेत. हिवाळ्यात पूर्व युरोप आणि पूर्व इराणहुन स्थलांतर करून येणारे हे पक्षी हजारोच्या संख्येने भारतात दाखल होतात. जवळपास सात हजार किलोमीटरचा प्रवास करून उपजीविकेसाठी ते आपल्या रायगड जिल्ह्यात दाखल झाले असल्याचे दिसून येत आहे.

मुबलक खाण्यासाठी प्रवास

पावसाळा संपला की जंगल, माळराने, शेती यामध्ये गवताची वाढ मोठ्या प्रमाणात होते. या गवतावर थंडीच्या दिवसात कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. या कीटकांना खाण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करून प्रवासी पक्षी रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

जंगलाला लावल्या जाणार्‍या वनव्यांमुळे स्थलांतरित कीटक मरतात. परिणामी या पक्षांना खाद्य मिळत नाही. त्यामुळे पर्यावरणातील समतोल ढासळत चालला आहे. वणवा लावण्याचे प्रमाण कमी झाले तर आपल्या भागात भविष्यात आणखी विविध स्थलांतरित पक्षी येतील.

-राम मुंढे, पक्षी अभ्यासक

-धम्मशील सावंत, खबरबात

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply