मुरूड : प्रतिनिधी
जेव्हा आपण दुसर्यांच्या कामी येतो, तेव्हा त्यांचे आशीर्वाद आपणास मिळत असतात. पैशाचा उपयोग जनसेवेसाठी झाला तर लोकांचे आशीर्वाद मिळून आपला निश्चितच फायदा होतो, असे प्रतिपादन ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी मुरूड येथे केले. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी मुरूड येथील संजवनी आरोग्य सेवा संस्थेस भेट दिली, यावेळी ते बोलत होते. विनाकारण गोळ्या, औषधे न खाण्याचा सल्ला त्यांनी या वेळी दिला. विनाकारण गोळ्या खाऊ नका, त्याचा परिणाम किडनीवर होत असतो. दर महिन्याला दीड लाख लोक डायलेसिस करीत असतात. 12 टक्के लोकांना मधुमेह आहे. चालणे हा मधुमेहावर उत्तम उपाय आहे. प्रत्येकाने दिवसातून किमान पाच किलोमीटर तरी चालणे खूप आवश्यक आहे, असे डॉ. लहाने यांनी सांगितले. संजवनी आरोग्य संस्थेस एक नवीन डायलेसिस मशीन देण्याचे यावेळी उद्योगजक व समाजसेवक डॉ. सनाउल्ला घरटकर यांनी जाहीर केले. संजवनी आरोग्य संस्थेच्या डायलेसिस सेंटरचे प्रमुख डॉ. मकबूल कोकाटे यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते डायलेसिस सेंटरमधील कर्मचार्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.संजवनी आरोग्य सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे, उपाध्यक्ष चंद्रकांत अपराध, सचिव अजित गुरव, खजिनदार कीर्ती शहा, संचालक जहूर कादरी, शशिकांत भगत, संचालिका वासंती उमरोटकर, नितीन आंबुर्ले, आदेश दांडेकर, रुग्णवाहिका कमिटीचे अध्यक्ष राशीद फहीम, माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.