अलिबाग ः प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना राजकीय पार्श्वभूमी पाहून मदतीचे वाटप केले जात आहे. दोन महिन्यांपूर्वी पडलेल्या घराला, ज्याच्या घरांचे दोन पत्रे उडालेत अशा लोकांना दीड लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, परंतु ज्यांचे खरंच नुकसान झाले आहे त्यांना मात्र अद्याप मदत मिळाली नाही. नुकसानीचे पंचानामेदेखील राजकीय हेतूने प्रेरित होऊनच केले गेले आहेत. पंचनामे करताना काही लोकांना जाणूनबुजून डावलण्यात आले, असा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. निसर्ग वादळात झालेले नुकसान व मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रवीण दरेकर तीन दिवसांच्या कोकण दौर्यावर आले होते. मंगळवारी (दि. 30) त्यांनी अलिबाग येथे रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेऊन कामाचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजप आमदार रवी पाटील, भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते या वेळी उपस्थित होते.
मी आढावा घेतला आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधला आहे. तेव्हा हे लक्षात आले की ज्यांचे निसर्ग चक्रीवादळात नुकसान झाले नाही त्यांना प्रथम नुकसानभरपाई देण्यात आली. ज्याचे नुकसान झाले त्यांना अजून मदत मिळाली नाही. मतद वाटपात भ्रष्टाचार होत आहे. जनतेच्या पैशांचा हा अपव्यय आहे. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मदत वाटपातील भ्रष्टाचाराची तसेच पंचनाम्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. हेक्टरी 50 हजार ही तुटपुंजी मदत आहे. कोकणातील वादळग्रस्तांची ही थट्टा आहे. कोकणातील वादळग्रस्तांना झाडांच्या संख्येनुसार मदत द्यावी, अन्यथा ही मदत व्यर्थ ठरेल. त्यामुळे मदत देण्याबाबत राज्य शासनाने पुनर्विचार करावा. तसेच जी वीज देयके देण्यात आली आहेत ती माफ करावीत, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती दरेकर यांनी या वेळी दिली.
सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती, परंतु 50 टक्केदेखील कर्जमाफी झालेली नाही. ज्यांनी कर्जांची परतफेड वेळेत केली आहेत त्यांना सन्मान म्हणून 50 हजार रूपये देण्यात यावे. कोकणातील माणूस प्रमाणिकपणे कर्ज भरतो. त्याच्यावर अन्याय होत आहे. ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले त्याला द्यायची वेळ आली तेव्हा शिवसेनेने हात आखडता घेतला. सत्तेत आल्यानंतर शिवसेना कोकणी माणसाला विसरली. शिवसेनेला सत्तेचा वाण नाही पण गुण लागला, अशी टीका विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केली. केंद्राची मदत मिळाली नाही असे सांगून राज्य शासन आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या मागणीमुळेच केंद्रीय पथक कोकणाच्या दौर्यावर आले. त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्यांचा अहवाल गेल्यानंतर केंद्र सरकारकडून निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना नक्की मदत मिळेल. केंद्र सरकारची मदत लवकर मिळावी यासाठी मी व विधानसभेतील विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करू, असेही विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.