कर्जत तालुक्याचा पारा 42 अंशावर
पुणे : प्रतिनिधी
वायव्य दिशेकडून येणारे उष्ण वारे निरभ्र आकाशामुळे थेट महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास करत आहेत. त्यामुळे कोकणासह, महाराष्ट्र तसेच राजस्थान आणि गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात तापमानाचा पारा चढाच राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने 21 मार्चपर्यंत राज्यभरात अनेक ठिकाणी सौम्य उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
कर्जत : प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे पुढील तीन दिवस उष्माघाताचा त्रास जाणवणार आणि त्यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कर्जत तालुक्यात बुधवारी (दि. 16) 42 अंश एवढे तापमान नोंदवले गेले आहे. कालप्रमाणे आजदेखील दुपारपासून रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. दरम्यान, कर्जत तालुक्याचे तापमान 42 तर माथेरानचे तापमान 38 एवढे नोंदवले गेले आहे. 15 मार्च रोजी कर्जत तालुक्यातील पारा चाळीशी पार करून पुढे गेला होता. त्यात शासनाकडून आलेले निर्देश आणि सूचना यामुळे लोकांनी खबरदारी घेत घराबाहेर कामाशिवाय घराबाहेर पडण्याचे टाळले होते. कर्जत तालुक्यातील दोन ठिकाणी तापमान मोजण्याची यंत्रणा आहे तेथे दररोजचे तापमान मोजून त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला कळविली जाते. कर्जत तालुक्यात कर्जत नगरपालिका हद्दीत दापोली कृषी संधोधन केंद्राच्या भात संशोधन केंद्रात दैनंदिन तापमान मोजणारे यंत्र बसविले आहे. त्याचवेळी माथेरान या पर्यटनस्थळी गिरीस्थान नगरपालिका कडून देखील दैनंदिन तापमान मोजले जाते आणि जिल्हा प्रशासनाला कळविले जाते.