Breaking News

गणेश मूर्तिकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार -विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

पेण ः प्रतिनिधी

गणेशमूर्ती परदेशात किंवा देशातील विविध भागांत वेळेवर पोहचण्यासाठी त्यांना वाहतूक परवाना मिळावा याबाबत शासनाशी चर्चा करून तो लवकर मिळवून देण्यासाठी तसेच गणेश मूर्तिकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पेण येथे झालेल्या बैठकीत केले.

कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा, पाहणी व मदतीसाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर भाजप आमदारांसह कोकण दौर्‍यावर असून त्यांनी पेण येथे गणेश मूर्तिकारांची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. कोकणामधील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणे, तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करणे व त्या जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय यंत्रणांना मदत करण्याच्या दृष्टीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील भाजपचे आमदार मंगळवार (दि. 19)पासून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या दौर्‍यावर आले आहेत.

त्या अनुषंगाने त्यांनी पेण येथील गणेश मूर्तिकारांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रसाद लाड, आमदार भाई गिरकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, राजेश मापारा, भाजप पेण तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, जिल्हा सरचिटणीस बंडू खंडागळे, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार अरुणा जाधव, मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्यासह गणेश मूर्तिकार व पत्रकार उपस्थित होते.

या वेळी पीओपीबाबतही योग्य निर्णय घेऊन पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. गणेशमूर्ती व्यवसायाला हवी तशी उभारी आली नाही. त्यासाठी आपण प्रयत्न करू, असा विश्वासही त्यांनी दिला.

बँकांनी भांडवल दिले असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती स्थिरस्थावर होईपर्यंत सहा महिने मुदत द्यावी व ती मिळविण्यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

गणेशोत्सव हा श्रद्धा व भावनेचा विषय असून आम्ही तुमच्यासोबत आहोत. कोकणावर गणपतीची कृपा असून शासन-प्रशासनाकडे मूर्तिकारांच्या समस्या मांडल्या असून जिल्हाधिकार्‍यांचीही याबाबत सकारात्मक भूमिका आहे, असे आमदार रविशेठ पाटील यांनी या वेळी सांगितले.

महाडमध्ये कोविड-19 सेंटरसाठी भाजप आमदार देणार 40 लाखांचा निधी

महाड : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत कोविड-19 सेंटरसाठी भाजप आमदारांकडून 40 लाखांचा निधी दिला जाईल, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. कोकणातील कोरोना महामारी उपाययोजना आणि समस्या जाणून घेण्यासाठी दरेकर यांच्या नेतृत्वाखालील आमदारांच्या पथकाची महाड उपविभागीय अधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीस माजी राज्यमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण, आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, प्रमोद जठार, प्रसाद लाड, महेश बालदी, निरंजन डावखरे, भाजप पदाधिकारी राजेय भोसले, बिपीन महामूणकर, जयवंत दळवी आदींसह अधिकारी उपस्थित होते. राज्य सरकार कोरोनाला अटकाव करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यात सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप या पथकाने केला.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply