अलिबाग : प्रतिनिधी
देशातील कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकार तर्फे 21 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत पोषण पंधरवडा अभियान राबविण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने या अभियानात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. रायगड जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची संख्या व लोकसहभाग या दोन्हीही प्रकारात रायगड जिल्ह्याने हे यश मिळविलेले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी दिली. माता आणि बालके सदृढ रहावी, यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गतच माता व बालकांना सशक्त करण्यासाठी रायगड जिल्ह्यात 21 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत पोषण पंधरवडा अभियान राबविण्यात आले. या अभियानात 21 मार्च 2022 ते 27 मार्च दरम्यान रायगड जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे वजन व उंची यांची पोषण ट्रॅकर अॅपमध्ये नोंद करण्यात आली. 28 मार्च 2022 ते 4 एप्रिल 2022 पर्यंत गावपातळीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामधील पालक मेळावा, माता बैठका, प्रभात फेरी, पोषण रॅली, स्वच्छता मोहीम कार्यक्रम, ऑनलाईन वेबिनार, सायकल रॅली, लसीकरण, किशोरवयीन मुलींची एचबी तपासणी कार्यक्रम, सुपोषण दिवस, बालकांच्या 1000 दिवसांबाबत जनजागृतीपर कार्यक्रम तसेच गृहभेटी अशा विविध उपक्रमांवर रायगड जिल्ह्यामध्ये भर देवून पोषण उपक्रम व लोकसहभाग या दोन्ही वर्गवारीमध्ये रायगड जिल्ह्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. पोषण पंधरवडा अंतर्गत जिल्ह्यातील 17 प्रकल्पांमध्ये 37 लाख उपक्रम राबवित राज्यात उपक्रमांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाल्याने राज्यात लोकसहभागातही रायगड जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. पोषण महा उपक्रम यशस्वी राबविण्यासाठी जिल्हा परिषद विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंच, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मेहनत घेतली.
पोषण पंधरवडा अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. महिनाभरात जिल्ह्यात 37 उपक्रम राबवित राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत या उपक्रमासाठी लोकसहभाग लाभल्याने, लोकसहभागातही रायगड जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
-डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद