मुरूड : प्रतिनिधी
आगामी नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 5) मुरूड येथे केले. रुग्णवाहिकेच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आमदार प्रशांत ठाकूर मुरूड येथे आले होते. त्या वेळी मीट दि प्रेस या कार्यक्रमात ते पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारात अडकले असून पुढील निवडणुकीत जनता निश्चितच भाजपला कौल देईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकार सामान्य जनतेची गळचेपी करीत असून जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. हे सरकार फक्त भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे काम करीत असल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केला. येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे किमान 150 आमदार निवडून येतील, अशी रणनीती भारतीय जनता पक्षाने तयार केली असून, यात आम्हाला निश्चित यश मिळेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. मच्छीमार बांधवांच्या डिझेल परताव्याचे पैसे मागील तीन वर्षांपासून रखडले आहेत. महाविकास आघाडी सरकारला अन्य बाबींवर खर्च करण्यासाठी पैसे आहेत, मात्र डिझेल परतावा देण्यासाठी पैसे नाहीत. डिझेल परताव्यासाठी रायगड जिल्ह्याला 26 कोटींपेक्षा जास्त रक्कम आवश्यक असताना फक्त सहा कोटी रुपये देण्यात आले आहेत. डिझेल परताव्याचे पैसे मिळत नसल्याने लहान मच्छीमार संस्था मेटाकुटीस आल्या आहेत. याबाबत भाजप आमदार महेश बालदी यांनीही विधीमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. यापुढे डिझेल परतावा रक्कम वाढवली नाही, तर मच्छिमारांसाठी भाजपतर्फे मोठे जनआंदोलन छेडणार येईल, असे आमदार ठाकूर यांनी या वेळी सांगितले. नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे विमानतळ असे नाव द्यावे, अशी कोणत्याही संघटनेने मागणी केली नव्हती. या विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे ही भाजपची आग्रही भूमिका आहे. ज्या भूमिपुत्रांसाठी दि. बा. पाटील लढले व न्याय मिळवून दिला, त्यांना विसरणे कदापी शक्य नाही. जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जात नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन करीतच राहणार, असे आमदार ठाकूर यांनी स्पष्ट केले. सिडकोमार्फत रद्द करण्यात आलेल्या भूखंडासंदर्भात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, राज्य शासनाकडून द्वेष भावनेने आम्हाला नोटीस देण्यात आलेली आहे. वास्तविक राज्य शासनाची नोटीस व प्रत्यक्षात असणारी स्थिती यांच्यात मेळ जुळत नाही. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. अदानी पोर्टमार्फत दिघी व आगरदांडा परिसरात विकास होत असून तेथे स्थानिक नागरिकांना थेट व अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त होणार आहे. स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी भाजप आग्रही राहिल, असे आमदार ठाकूर म्हणाले. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष परेश किल्लेकर आदी या वेळी उपस्थित होते.