उरण : प्रतिनिधी
उरण नगर परिषद प्रशासनाने लवकरच मान्सून पूर्व नाले सफाईला प्रारंभ केला आहे. शहरातील दादर, कुंभारवाडा, कामठा, भिवंडीवाला गार्डन या मुख्य नाल्यांची सफाई ही ठेकेदारामार्फत करण्यात येत आहे.
दरवर्षी उरण नगर परिषद मे अखेरिस मान्सूनपूर्व नाले सफाई करण्याची कामे हाती घेत असते, मात्र मागील वर्षी 2021च्या मे महिन्यात चक्रीवादळाने धुमाकूळ घातल्याने नाले सफाईला विलंब लागला होता. या वर्षी चक्रीवादळाचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत. या वर्षी तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी लवकरच नाले सफाई करण्याचा निर्णय घेऊन नाले साफसफाईच्या कामाला जोमाने प्रारंभ केला आहे.
द्रोणागिरी डोंगराकडून येणारे पाणी मुख्य नाल्याकडून तो थेट कोळीवाडा मार्गे समुद्रात जात आहे. त्यामुळे त्या नाल्याची सफाई ही प्रथम केली जात आहे. शहरातील गटारामध्ये कचरा प्लास्टिक जाऊन पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडल्याने गटारे तुंबली जातात आणि त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होत असते. नागरिकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये या पूरस्थितीपासून उरण शहर वासीयांची सुटका होण्यासाठी नगरपालिका तत्पर होऊन मान्सून पूर्व नालेसफाईला सुरुवात करण्यात आली आहे.