Breaking News

वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे खारघर

भाजपकडून महावितरणकडे आंदोलनाचा इशारा

खारघर : रामप्रहर वृत्त

उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच गेल्या काही दिवसांपासून खारघर-तळोजा शहरामध्ये वेळीअवेळी वीजपुरवठा कोणत्याही पूर्वसूचना न देता खंडित केला जात आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी तसेच व्यावसायिकांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा कारभार उन्हाळ्यामध्ये नियोजन शून्य झालेला असून आठवड्यात अनेक वेळा वीज खंडित होत आहे. यामुळे नागरिकांच्या अनेक तक्रारी स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्याकडे येत आहेत. यापार्श्वभूमीवर  भाजप नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी महावितरणला निवेदनाद्वारे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

खारघरमधील नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. जे. पाटील यांची खारघर सेक्टर 12 मधील कार्यालयात मंगळवारी (दि. 10) भेट घेतली. यामध्ये वारंवार खंडित होणार्‍या विजपुरवठ्याबाबत एक निवेदन दिले.

दिवसेंदिवस तापमान वाढत चालले आहे. साधारण 42 ते 44 अंश तापमानात राहणे खरोखरच असह्य आहे. अशा वातावरणात खारघर, तळोजा शहरात वीजपुरवठा अचानक खंडित करण्यात येतो. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. विजपुरवठा खंडित होत असल्यने नागरीकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, तसेच विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन तसेच ऑफलाइन परीक्षा चालु आहेत. यामुळे त्यांच्या अभ्यासात व परीक्षेत अडथळा निर्माण होत आहे. या सर्व समस्यांची दखल घेऊन भाजपचे खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, पनवेल महापालिकेचे नगरसेवक अभिमन्यू पाटील, रामजी बेरा, निलेश बाविस्कर, नगरसेविका नेत्रा पाटील, सरचिटणीस किर्ती नवघरे, युवा नेते समीर कदम, अमर उपाध्याय, वासुदेव पाटील, उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी खारघर सेक्टर 12 येथील महवितरणच्या कार्यालयाला भेट दिली. महावितरणकडे एक निवेदन दिले व खंडित वीजपुरवठ्यासंदर्भात महावितरणच्या अभियंत्यांना भेटून प्रश्न विचारले.

खारघर शहरात अघोषित भारनियमन (लोडशेडींग) आहे का? या प्रश्नावर अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. जे. पाटील यांनी  भारनियमन आहे, पण खारघर शहरात बिलांची वसुली चांगली असल्याने भारनियमन करीत नाही असे सांगितले. गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अभियांत्रिकी बिघाडामुळे वीजप्रवाह खंडित करावा लागला होता. पण यापुढे कमीत कमी वेळा वीजपुरवठा खंडित होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू असे सांगितले. आपले हे म्हणणे आपण आमच्या निवेदनाच्या उत्तरादाखल लिखित स्वरुपात द्यावे त्यामुळे आमचे तसेच खारघरवासियांचे समाधान होईल, असे शिष्टमंडळातर्फे सांगण्यात आले आहे. येणार्‍या दिवसात जर अकारण वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा शहर मंडळाच्या शिष्टमंडळाने दिला आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply