बंगळुरू ः वृत्तसंस्था
बंगळुरू संघाची हाराकिरी सुरूच असून, दिल्लीने बंगळुरूवर 4 गडी राखून विजय मिळवला. घरच्या मैदानावर खेळताना बंगळुरूला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावत दिल्लीचा विजय दृष्टिपथात आणला. सामनावीराचा मान कागिसो रबाडा याला मिळाला. बंगळुरूने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन तिसर्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर आलेला कर्णधार श्रेयस अय्यर आणि सलामीवीर पृथ्वी शॉ यांनी धावफलक हलता ठेवला. एका बाजूने खिंड लढवत तुफान फटकेबाजी करत कर्णधार श्रेयस अय्यरने आपले अर्धशतक पूर्ण केले. 37 चेंडूत फटकावलेल्या 50 धावांमध्ये 7 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. श्रेयसच्या या कामगिरीने दिल्लीला विजयाच्या उंबरठ्यावर नेले.