पोलादपूर : प्रतिनिधी
काटेतळी येथून पोलादपूर एस.टी.स्थानकामध्ये चरई गावात जाण्यासाठी पोलादपूर बोरावळे एस.टी.बसमध्ये बसण्यासाठी गाडीत चढणार्या वृध्द महिलेच्या हातातील प्रत्येकी एक तोळा सोन्याच्या दोन बांगड्या सर्हाईत चोरट्यांनी कापून नेल्याच्या घटनेने पोलादपूर पोलीस चक्रावून गेले आहेत. यापूर्वी पोलादपूर एस.टी.स्थानकातून एका आदिवासी महिलेचे बाळ चोरीला गेले तरी पोलिसांंना चोरटयांचा तपास लागत नसल्याने जनतादेखील हवालदिल आहे.
पोलादपूर तालुक्यातील चरई हनुमानवाडीतील वृध्द महिला सुनंदा दिनकर सकपाळ ही काटेतळीला गांवदेवीच्या पूजेला आली असता तेथे मुक्काम करून ती चुलत बहिण वनिता रामदास सकपाळ हिच्यासोबत सकाळी चरई येथे जाण्यासाठी पोलादपूर एस.टी.स्थानकामध्ये आली होती. या वेळी पोलादपूर बोरावळे गाडीची वाट बघत त्या थांबल्या होत्या. बोरावळेला जाणारी एस.टी.बस साधारणत: 9 वाजता आली असता दोघी गाडीमध्ये बसण्यासाठी चढत असताना तीन व्यक्ती दरवाजातच उभ्या होत्या. त्यामुळे त्यांचा गाडीच चढण्यात अडथळा होऊन वनिता सकपाळ हिने तुम्ही गुंड आहात काय, गाडीत चढायचे नसेल तर आम्हाला अडचण का करता, असे सुनावले तर त्यांनी कंडक्टर नसल्याने आम्ही उतरत आहोत असे सांगून तिघेही मराठी भाषेतच उत्तर देत गाडीतून उतरले. दोघीही गाडीमध्ये बसल्या. त्यावेळी सुनंदा सकपाळ यांना त्यांच्या उजव्या हातातील दोन सोन्याच्या बांगडया नसल्याचे लक्षात आले. यादरम्यान, वृध्द महिलेने तिचा मुलगा शंकर सकपाळ याच्यासोबत जाऊन पोलादपूर पोलिसांकडे या चोरीची रितसर फिर्याद दिली.
एसटी स्थानकात कॅमेरे नाहीत
पोलादपूर एस.टी.स्थानकामध्ये सीसीटिव्ही कॅमेरे नसल्याने चोरी करणार्या व्यक्तींबाबत तपास लावण्याचे आव्हान पोलादपूर पोलिसांना आहे. चोरीनंतर पोलिसांनी तातडीने पोलादपूर शहरामध्ये विविध दुकानांमध्ये चौकशी करून चोरटे शहरामध्ये आले अथवा परस्पर महामार्गावरून फरार झाले का याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला.