Breaking News

सुक्या मासळीच्या खरेदीसाठी आठवडा बाजारात गर्दी

उत्पादन घटल्याने किमतीत भरमसाठ वाढ

अलिबाग : प्रतिनिधी

मान्सूनचे वेध लागताच रायगड जिल्ह्यात आगोटीची तयारी सुरु झाली आहे. सुक्या मासळीच्या खरेदीसाठी ग्राहक आठवडा बाजारात गर्दी करत आहेत. पावसाळ्यात अडीच ते तीन महिने ओली मासळी मिळत नसल्याने सुकी मच्छी साठवून ठेवली जाते. पोयनाड, म्हसळा आणि दासगावच्या बाजारातील मासळीला खवैय्यांची अधिक पसंती आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे सुकी मासळीदेखील चांगलाच भाव खात आहे.

पावसाळ्यात खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी असल्याने या कालावधीत बाजारात मासळीची आवक कमी असते. परिणामी मासळीचे दरही गगनाला भिडलेले असतात. त्यामुळे या काळावधीत खवय्यांना सुक्या मासळीचा आधार वाटतो. यासाठी पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची खरेदी करुन ती घराघरात साठवली जाते. त्यामुळे सध्या बाजारात सुकी मासळी खेरदी करण्यासाठी गर्दी होत आहे.

मासळीची मोठी बाजारपेठ म्हणून रायगड जिल्हा प्रसिद्ध आहे. सुकवलेल्या मासळीलाही मोठी बाजारपेठ आहे. डिसेंबर जानेवारीमध्येच ओली मासळी सुकवली जाते. स्थानिक बाजारात सुक्या मासळीला किंमतही मिळत आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील सुकी मासळी दलालांमार्फत मुंबईतील मरोळ बाजारात विक्रीसाठी पाठवली जाते. तेथून ही मासळी राज्यभरातील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठवली जात आहे.

अलिबाग तालुक्यात पोयनाड, सहाण, नागाव आठवडा बाजार तसेच अलिबाग, चोंढी, रेवदंडा मुरूड तालुक्यामध्ये राजपुरी, बोर्ली, मुरुड शहर. पेण तालुक्यात वडखळ आठवडा बाजार तसेच पेण शहर, आणि वावोशी, पनवेल तालुक्यात पनवेल शहर. सुधागडमध्ये  पाली, परळी. उरण तालुक्यात उरण शहर, करंजा, मोरा. कर्जत तालुक्यात कर्जत शहर, नेरळ. खालापूरात  खोपोली, खालापूर. रोहा तालुक्यात  रोहा शहर, अष्टमी, चणेरा. माणगाव तालुक्यात माणगाव शहर, निजामपूर. श्रीवर्धनमध्ये  बोर्ली, श्रीवर्धन शहर. म्हसळा तालुक्यात   म्हसळा. तळा तालुक्यात तळा. महाड तालुक्यात  महाड शहर, बिरवाडी. पोलादपूर तालुक्यात पोलादपूर या रायगड जिल्ह्यातील सुक्या मासळीच्या बाजारपेठा आहेत. सुकवलेल्या मासळीतून येथे वर्षाला सुमारे 30 ते 35 कोटी रुपयांची उलाढाल होते.

मासळी सुकवण्याची प्रक्रिया प्रामुख्याने हवामानावर अवलंबून असते. खारे वारे जोरात वाहत असतात, तेव्हा मच्छी चांगल्या प्रमाणात सुकते. तसेच, त्यासाठी हवामान थंडही लागते. यामुळे डिसेंबर जानेवारीमध्ये मासळी सुकविली जाते. मासे उन्हात सुकवून त्यांच्या शरीरातून पाणी काढून टाकले जाते. मासे सुकत टाकण्यापूर्वी त्यांच्या शरिरातील अन्न मार्ग तसेच इतर काही इंद्रीये काढली जातात. त्यानंतर मिठाच्या पाण्यात बुडवून माशांना सुकविण्यात येते. बोंबील, बांगडा, मांदेली, सुरमई अशा रितीने सुकविण्यात येतात.

मासळीच्या उत्पादनात दरवर्षी घट होताना दिसते आहे. शिवाय मासे सुकवण्यासाठी लागणारे मनुष्यबळदेखील कमी पडत आहे. त्यामुळे सुक्या मासळीचे दर दरवर्षी वाढताना दिसत आहेत. असे असले तरी आपल्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी खवय्ये सुकी मासळी खरेदी करीत असतात.

सुक्या मासळीचे सध्याचे दर (रुपये : प्रतिकिलो)

सुकट  : 400 ते 450

अंबाड  : 500 ते 800

मोठी वाकटी : 400 ते 550

छोटी वाकटी : 400 ते 500

बोंबील : 400 ते 550

मांदेली : 200 ते 220

खारी सुरमई : 800 ते 850

बांगडा : 350 ते 400

कोळंबी सोडे : 1300 ते 1500

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply