Breaking News

माथेरानमध्ये पर्यटकांची रेकॉड ब्रेक गर्दी

वाहतूक कोंडीमुळे घाटरस्ता जाम

कर्जत : प्रतिनिधी

जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानचा पर्यटन हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे, लागून आलेल्या शनिवार, रविवारच्या सुट्टीमुळे माथेरानमध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे, त्यामुळे येथील व्यवसाईक सुखावले आहेत.

गेली दोन वर्ष कोरोना महामारीने सर्व ठिकाणी मंदीचे सावट पसरले होते, त्यात यावर्षी संपूर्ण एप्रिल तसेच अर्धा मे महिन्यात माथेरानमध्ये पर्यटन कमी असल्याने येथील व्यवसाईक चिंतेत होते. मात्र या आठवड्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरानला आल्याने येथील व्यवसाईक मनोमन सुखावले आहेत. त्यातच बोहरा समाजाचे धर्मगुरु शुक्रवारपासून माथेरानमध्ये आल्याने त्या समाजाचे लोकसुध्दा माथेरानला मोठ्या प्रमाणात येत आहेत. धर्मगुरु बुधवारपर्यत येथेच राहणार असल्याने बोहरा समाज जास्त प्रमाणात माथेरानला येण्याची शक्यता आहे. शनिवार व रविवार या दोन दिवसात आठ ते दहा हजारापेक्षा जास्त पर्यटक माथेरानमध्ये आल्याची माहिती मिळाली आहे.

नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर वाहतूकची कोंडी

खाजगी गाड्या घेऊन माथेरानमध्ये येणार्‍यांची पर्यटकांची संख्या जास्त आहे. मात्र पोलिसांच्या नियोजन शुन्य कारभाराचा फटका येणार्‍या पर्यटकांना बसत आहे. नेरळ-माथेरान घाटरस्त्यातील वॉटरपाइप स्टेशनपुढे झालेल्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना पर्यटकांची चांगलीच दमछाक झाली. त्यांना दोन किलोमीटर अंतर कापण्यासाठी एक तासाचा कालावधी लागत होता. येथील तिसर्‍या वळणावर वाहनांची गर्दी होत असल्याने तेथे वाहतूक नियंत्रण पोलिसांची गरज असल्याचे पर्यटकाकडून बोलले जात आहे. पण वाहतूक नियंत्रण पोलीस नसल्याने पर्यटकांच्या त्रासात अधिकच भर पडली. येथील टॅक्सी चालक अनिल सुर्वे यांनी वाहतूक नियंत्रण पोलिसांची भूमिका बजावून वाहतूक सुरळीत केल्यामुळे पर्यटकांना काही अंशी दिलासा मिळाला.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply