राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
मुंबई : प्रतिनिधी
गेल्या तीन वर्षांत राज्यात दोन वेळा सत्तापालट झाले. या दोन्ही वेळी प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या व यातून सत्तेची समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर 2019च्या सत्तानाट्यावरून टीकास्त्र सोडले आहे. हिप बोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते पहिल्यांदाच मंगळवारी (दि. 23) रवींद्र नाट्यमंदिरात झालेल्या सभेत बोलत होेते.
या वेळी बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये 2019 साली झालेल्या फारकतीवर तोंडसुख घेतले. 2019मध्ये निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेने भाजपशी फारकत घेतली. का? तर म्हणे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाबाबत ठरले होते. मला अजूनही आठवतंय बाळासाहेब ठाकरे असताना झालेल्या त्या बैठकांमध्ये मी होतो. बाळासाहेब, मनोहर जोशी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असे बरेच जण होते. तिथे पहिल्यांदा ती गोष्ट ठरली की ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री. जर ही गोष्ट तुमच्यात ठरली आहे, तर 2019मध्ये तुम्ही मुख्यमंत्रिपदाची मागणी करूच कशी शकता, असा सवाल राज यांनी केला.
हे म्हणतात मी शब्द घेतला होता. चार भिंतींमध्ये शब्द घेतला होता? तिथे दोनच माणसे. एक तर हे खरे बोलतायत किंवा ते खरे बोलतायत. मुळात तुम्ही मागणी करताच कशी? जास्त आमदार असणार्याचा मुख्यमंत्री हे ठरले असताना तुम्ही मागणी करताच कशी? मोदी व्यासपीठावर भाषण करताना तिथे उद्धव ठाकरे बसलेले होते. मोदी त्यांच्या भाषणात सांगत होते की आपली पुन्हा सत्ता येईल आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. अमित शाह यांनीही भाषणात फडणवीस मुख्यमंत्री होतील असे सांगितले. त्याचवेळी आक्षेप का नाही घेतला? फोन का नाही केला? सगळे निकाल लागल्यानंतर मग तुम्हाला आठवले? अशी टीका राज ठाकरेंनी केली.
नुपूर शर्मांच्या वक्तव्याचे समर्थन
या वेळी बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नुपूर शर्मां यांचे समर्थन केले. नुपूर शर्मा यांनी माफी मागायची काही गरज नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. झाकीर नाईक आपल्या हिंदू देव-देवतांचा अवमान करतो, त्यांच्यावर वादग्रस्त टिपण्णी करतो, पण त्यावर कोण काही बोलत नाही, झाकीर नाईकला कोणी माफी मागायला लावत नाही. औवेसी आपल्या देवी-देवतांच्या नावावरून हेटाळणी करतात, असे सांगत राज यांनी नुपूर शर्माच्या वक्तव्याचे समर्थन केले.