धाटाव : प्रतिनिधी
सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेडला अमेरिकेच्या लाईव्ह वीक ग्रुपतर्फे सामाजिक बांधिलकी उपक्रमातील (सीएसआर) उल्लेखनीय कार्यासाठी सलग दुसर्यांदा ‘इंडिया महात्मा अवॉर्ड्स 2021’ने सन्मानित करण्यात आले. पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी आणि लाईव्ह वीक ग्रुपचे अमित सचदेव यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुदर्शन केमिकल्सच्या पीपल प्रॅक्टिस विभागाच्या प्रमुख शिवालिका पाटील आणि ‘सीएसआर’ विभागाच्या उपसरव्यवस्थापक माधुरी सणस यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
भारतातील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे (सीएसआर) जनक, उद्योजक आणि समाजसेवक अमित सचदेव यांनी महात्मा पुरस्कार सुरू केलेला आहे. सामाजिक शाश्वत विकासासाठी कार्यरत असलेल्या लाईव्ह वीक ग्रुप या जागतिक दर्जाच्या संस्थेमार्फत हे पुरस्कार दिले जातात. जगभरात समाजासाठी महत्त्वपूर्ण व भरीव कामगिरी करत असलेल्या व्यक्ती व संस्थांच्या कामाची जागतिक स्तरावर ओळख व्हावी, यासाठी हा ‘इंडिया महात्मा पुरस्कार’ दिला जातो.
शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक विकास क्षेत्रात ‘सुदर्शन’ने भरीव काम केले आहे. कोरोनाच्या काळात सुदर्शन केमिकल्सने केलेले कार्य उल्लेखनीय होते. वैद्यकीय, जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा सुदर्शन केमिकल्सने केला. शिवाय, कर्मचार्यांच्या आणि रोहेवासीयांच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन व लसीकरण शिबिरे घेतली.