Breaking News

महाविकास आघाडीला मोठा धक्का

विधान परिषद निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी

मुंबई : प्रतिनिधी
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपचे तीन, तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेला आहे. या विजयामुळे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चाणक्यनीती यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. मतदान झाल्यानंतर दोन्ही बाजूंकडून एकमेकांच्या काही आमदारांची मते बाद ठरवण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात मध्यरात्री निवडणूक आयोगाने निर्णय देत महाविकास आघाडीचे सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत भाजपने तीन जागा जिंकत बाजी मारली.
शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार या दोघांचा विजय होईल असा दावा केला जात होता, मात्र मतमोजणीत पवार यांना फक्त 38 मते पडली, तर धनंजय महाडिकांना 41 मते मिळून ते विजयी झाले. शिवसेनेसाठी हा पराभव धक्कादायक मानला जात आहे.
दरम्यान, भाजपच्या विजयानंतर राज्यभरात ठिकठिकाणी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, पेढे वाटून जल्लोष केला. तीन पक्षांविरुद्धची लढाई एकहाती जिंकल्याने जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

भाजप तिसरी जागा जिंकणारच होता. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे आग्रह धरला की, हा हट्ट करू नका. गेल्या 24 वर्षांत महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुका झाल्या नाहीत, पण त्यांना फटके खाल्ल्याशिवाय शहाणपण शिकता येत नसेल तर त्यांना तसेही फटके मिळतील.
-चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

शिवसेनेने लढवलेल्या सहाव्या जागेसाठी मतांची संख्या कमी होती, पण धाडस करीत प्रयत्न केला. अपक्ष आमदारांना आपल्या बाजूने घेण्यात भाजप यशस्वी ठरला. मान्य केले पाहिजे की, देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्यात यश आले आहे.
-खासदार शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply