अवैध शिकारी वाढल्या
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशभरात 2012 ते 2018 या सहा वर्षांच्या कालावधीत 656 वाघांचा मृत्यू झाला. यापैकी 31.5 टक्के म्हणजेच 207 वाघांचा मृत्यू अवैध शिकार व विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने झाला आहे. ही धक्कादायक माहिती नॅशनल टाइगर कंझर्वेशन अथॉरिटी (एनटीसीए) यांनी जारी केलेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे.
2014मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्र गणनेनुसार देशभरातील अंदाजे 40 टक्के म्हणजे 2,226 वाघ त्यांच्या निवासस्थानाच्या परिसराबाहेर राहतात. हे वाघ शिकार करण्यास असमर्थ ठरत असल्याने मनुष्याशी संघर्ष करताना ते बळी पडतात. आकडेवारीनुसार असे दिसून आले आहे की, 2012 आणि 2015मध्ये दोन अंकी असलेली असुरक्षित वाघांच्या मृत्यूची संख्या वाढून 2016च्या पुढे ती तीन अंकी झाली. साधारण एका महिन्यामध्ये नवीन व्याघ्रगणना होण्याची शक्यता आहे. ती या घटकावर अधिक प्रकाश टाकेल.
विशेष म्हणजे 118 (मृत्यू झालेल्यांपैकी 18 टक्के) वाघांच्या मृत्यूचे नेमके कारण सांगण्यात ‘एनटीसीए’ला अपयश आले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे राज्य वन विभागांनी याबाबतची नेमकी माहिती अद्यावत करून आयोगापर्यंत पोहचवलीच नाही. आकडेवारीनुसार वाघांचा मृत्यू झालेल्या राज्यांमध्ये मध्य प्रदेशचा 148 वाघांच्या मृत्यूसह सर्वात वर क्रमांक येतो. त्याखालोखाल महाराष्ट्र (107), कर्नाटक (100) आणि उत्तराखंड (82) यांचा क्रमांक लागतो. 2019मध्ये 41 वाघांचा मृत्यू झाला, यापैकी चार वाघांच्या मृत्यूचे कारण शिकार आहे. यावर्षीदेखील सर्वात जास्त आकडा हा मध्य प्रदेशचा (13), त्याखालोखाल महाराष्ट्र (7) असल्याची माहिती समोर आली आहे. 2014च्या गणनेनुसार मध्य प्रदेशचा (308) , कर्नाटक (408) आणि उत्तराखंड (340)च्या खालोखाल वाघांची सर्वाधिक संख्या असणार्या राज्यात तिसरा क्रमांक आहे. 124 वाघांची शिकार झाल्याचे त्यांच्या शवविच्छेदनानंतर आणि त्यांच्या शिकार्यांकडे आढळून आलेल्या अवशेषांवरून उघड झाले आहे. 295 वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला (एकूण 45 टक्के), तर 36 वाघ रस्ता किंवा रेल्वे दुर्घटनांमध्ये ठार झाले आहेत.