Breaking News

कळंबोलीत बेकायदा प्रवासी वाहतुकीवर कारवाई

पनवेल : बातमीदार

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जेथून सुरू होतो त्या कळंबोली मॅकडोनाल्ड बसथांब्यावर बेकायदा प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनचालकांना कळंबोली पोलिसांनी दणका दिला. वाहतूक पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा असताना येथील दलालांना कळंबोली पोलिसांनी धडा शिकविल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

मुंबईतून बाहेर पडल्यानंतर पुण्याकडून घाटमाथ्यावर जाण्यासाठी कळंबोली मॅकडोनाल्ड बसथांबा प्रसिद्ध आहे. सुटीच्या दिवसात रात्रीच्या वेळी रस्त्यावर बेकायदा थांबणार्‍या ट्रॅव्हल्समुळे येथे वाहतूक कोंडी होत असते. एसटीच्या थांब्याचा फायदा घेऊन या ठिकाणी दलालांचा सुळसुळाट झाला आहे. खाजगी गाड्यांना अडवून जबरदस्तीने कमिशन काढण्यासाठी प्रवासी भरले जातात. परराज्यातील ट्रॅव्हल्सना बळजबरीने प्रवासी दिले जातात. या बेकायदा प्रवासी वाहतुकीवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई अपेक्षित असताना कळंबोली पोलीस ठाण्याकडून सोमवारी कारवाई करण्यात आली.

पुण्याला जाण्यार्‍या खाजगी वाहनचालकांनी येथे बेकायदा थांबा तयार केला असून एसटीच्या गाडीला अडथळा केला जात आहे. त्याशिवाय एजंटदेखील वाढले असल्याची तक्रार आल्यामुळे कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. सहा वाहनचालकांना ताब्यात घेऊन प्रत्येकी 2300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

खाजगी वाहने थांबवून एजंटकडून प्रवासी वाहतूक केली जात असल्याची तक्रार आल्यामुळे आम्ही ही कारवाई केली. यापुढेही ही कारवाई सुरूच राहील. एसटीच्या बसथांब्यावर इतर कोणालाही थांबू देणार नाही. सुटीच्या काळात विशेष बंदोबस्त ठेवून लक्ष देण्यात येईल.

-सतीश गायकवाड,वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply