Breaking News

राजस्थानमध्ये अडकलेले विद्यार्थी महाराष्ट्रात परतले

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश

पनवेल : रामप्रहर वृत्त
नीट 2020 पूर्व परीक्षेसाठी राजस्थान कोटा येथे गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपल्या घरी पोहोचण्यासाठी राज्य शासनाने लवकरात लवकर नियोजन व कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आले असून, राज्यातील विद्यार्थ्यांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापैकी रायगड जिल्ह्यातील एकूण 34 जण बुधवारी (दि. 29) सुखरूप पोहोचले असून, या सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील जवळपास एक हजारहुन अधिक विद्यार्थी ’नीट 2020’ची तयारी करण्यासाठी राजस्थानमधील कोटा येथे गेले होते. कोरोना विषाणूचा प्रभाव कमी होण्यासाठी केंद्र सरकारने आधी 14 एप्रिल आणि नंतर 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे शिकण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आपल्या घरी परतण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या तसेच विद्यार्थ्यांची तेथे राहण्या-खाण्याची गैरसोय होत आहे अशा तक्रारी त्यांच्या पालकांनी केल्या होत्या. अनेक राज्यांनी त्या राज्यातील विद्यार्थी-पालकांच्या विनंतीवरून विशेष बसेसच्या माध्यमातून सामाजिक अंतराचे पालन करून आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी व्यवस्था केली. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनानेदेखील राजस्थान कोटा येथे अडकलेले विद्यार्थी लवकरात लवकर आपल्या घरी सुखरूप पोहोचावेत, यासाठी तातडीने नियोजन व कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती.  त्यानुसार हा प्रश्न मार्गी लागला असून पालकांनी व विद्यार्थ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
रायगडातील 34 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत!
कोटा येथून रायगड जिल्ह्यातील एकूण 34 जण सुखरूप पोहोचले असून खारघर येथील ग्रामविकास भवन येथे आणल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यातील कुणामध्येही कोविड-19ची लक्षण न आढळल्याने या सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. यामध्ये 27 विद्यार्थी आणि सात पालकांचा समावेश आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply