नवी मुंबई : बातमीदार
ऐरोली सेक्टर 15मध्ये सिडकोकडून बांधण्यात आलेले बाजार संकुल आता वापरात नाही. त्यामुळे बाजार संकुलाची इमारत धोकादायक झाली आहे. या इमारतीत मोठ्या प्रमाणावर गर्दुल्ले, मद्यपी यांचे उद्योग सुरू आहेत. ही इमारत जीर्ण झाल्यामुळे पडून दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे वापरात नसलेला या बाजार संकुलाचा भूखंड नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करावा आणि ती वास्तू सामाजिक कार्यासाठी वापरात आणावी, अशी मागणी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.ऐरोली सेक्टर 15 येथील भूखंड क्रमांक 19 येथे सन 1995 मध्ये सिडको नागरिकांसाठी बाजार संकुल (मार्केट) उभारले. सुमारे 50 ते 60 गाळे या बाजार संकुलात आहेत. सेक्टर 15 परिसरात सिडकोने निवासी मालकीच्या इमारती उभारताना या मार्केटची उभारणी केली होती. सुरुवातीचे काही महिने या बाजार संकुलाचा व्यापार्यांनी वापर केला, मात्र सुविधेअभावी मागील अनेक वर्षांपासून बाजार संकुलामधील गाळे बंद आहेत. त्यामुळे संकुलाची इमारत जीर्ण झाली आहे. इमारतीमधील एका बाजूचा भाग हा कोसळला असून छत व सज्याचे स्लॅब, तसेच खांबदेखील मोडकळीस आले आहेत. त्यामुळे ही इमारती कोणत्याही क्षणी पडून अपघात होऊ शकतो. या पडीक इमारतीत वाढत्या गर्दुल्यांच्या अनैतिक धंद्यामुळे परिसरातून येणार्या जाणार्या महिलांना याचा मनस्ताप सहन करावा लागतो. सिडकोने इमारतीत कोणताही वापर नसल्याने हा भूखंड नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करावा, तसेच पालिकेने या वास्तूचा लोकाभिमुख कार्याकरिता वापर करावा, अशी मागणी माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी आयुक्त बांगर यांच्याकडे केली आहे.
ही वास्तू मोडकळीस आली असून कोणत्याही क्षणी कोसळू शकते. सध्या डेंगी व मलेरियाचे रुग्ण वाढत असल्यामुळे येथे असणार्या अस्वच्छतेमुळे त्यात भर पडू शकते. या वास्तूचे महापालिकेने सिडकोकडून हस्तांतरित करून तिचा लोकाभिमुख कार्याकरिता वापर करावा.
-अशोक पाटील, माजी नगरसेवक, भाजप