बाजाराला ‘बंद’चे स्वरूप
पनवेल : बातमीदार – कोरोना विषाणूची 14 जणांना लागण झाल्याने भाजीची वाहतूक करणारी निम्मीच वाहने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजी बाजारात शुक्रवारी (दि. 1) दाखल झाली. गुरुवारी बाजारात भाजीची 169 वाहने आली होती, तर शुक्रवारी भाज्यांची 95 वाहने बाजारात आणली गेली. याच वेळी शनिवारपासून भाजी बाजारातील व्यापार्यांनी तुरळक भाजीची मागणी कमी करण्याचा निर्णय घेतल्याने बाजारात ‘बंद’चे स्वरूप आले आहे.
कोरोनाबाधितांचा आकडा अधिक असल्याने मुंबई महानगर क्षेत्रात टाळेबंदी कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बाजारात सध्या व्यापारी, काही माथाडी, मापाडी, वाहतूकदार आणि सर्वाधिक खरेदीदार अशी गर्दी होत आहे. व्यापार्यांनी गुरुवारी शेतमालाची कमी मागणी नोंदविल्याने भाजीची 169 वाहने एपीएमसीमध्ये आली होती. शुक्रवारी ही संख्या निम्म्यावर आली होती. शनिवारी ही संख्या याहून कमी होणार आहे. त्यामुळे एपीएमसीत अघोषित बंद असेल.
भाजी बाजारात खरेदीदारांची गर्दी होत आहे. ही खरेदी नागरिकांच्या सेवेसाठी नसून नफा कमावण्यासाठी आहे, असा आरोप काही व्यापार्यांनी केला आहे. एखाददुसरा खरेदीदार पोलिसांच्या भीतीने काही काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करतो. मात्र, पोलिसांची पाठ फिरताच टाळेबंदीचे सारे नियम धाब्यावर बसवले जातात. त्यामुळे व्यापारी वर्ग चिंतेत आहे.
नोटीस व संक्रमणाचेही भय
घाऊक बाजारात कोरोना रुग्णांची संख्या 20च्या घरात गेली आहे. त्यांच्या संपर्कात किती जण आले होते, याची तपासणी सुरू आहे. बाजार बंद करण्याचा सामूहिक निर्णय घेतल्यास समिती कारवाईची नोटीस बजावत आहे आणि बाजार सुरू ठेवल्यास कोरोनाचे भय आहे. अशा स्थितीत व्यापार्यांनी शेतमालाची मागणी कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.