Breaking News

मुंबईत इमारत कोसळून चौघांचा मृत्यू, 17 जण जखमी

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईच्या कुर्ला पूर्व परिसरातील नाईक नगर सोसायटीची एक इमारत सोमवारी (दि. 28) रात्री कोसळली. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित भूखंडावर उभ्या असलेल्या नाईक नगर सोसायटीची एक विंग सोमवारी रात्री 11.45च्या सुमारास कोसळली. या इमारतीमध्ये 40 बांधकाम मजूर राहत होते. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगार्‍याखाली अनेक रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत रहिवाशांची सुखरूप सुटका केली. या दुर्घटनेत 17 जण जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
स्थानिक आमदाराने गुवाहाटीतून जाहीर केली मदत
मुंबईतील इमारत दुर्घटनेत अडकलेल्या कुटुंबीयांना आणि मृतांच्या नातेवाइकांना स्थानिक आमदार आमदार मंगेश कुडाळकर यांनी थेट गुवहाटीमधून मदत जाहीर केली आहे. आमचे नेते एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार इमारत दुर्घटनाग्रस्त सर्व कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये आणि मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मी देत आहे, अशी घोषणा आमदार कुडाळकर यांनी केली. त्याचप्रमाणे पुढे बोलताना त्यांनी, मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे ढिगार्‍याखाली अडकलेत ते सुखरूप बाहेर यावेत अशी देवाचरणी प्रार्थना करतो, असे म्हणत आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply