पनवेल : वार्ताहर
रायगड जिल्हा टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यामध्ये कोविड-19 मध्ये मृत्यू पावलेल्यांच्या निकटवर्तीयांना तसेच विधवा महिला व अनाथ झालेल्या बालकांना शासन आपल्या दारी या संकल्पने अंतर्गत शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच त्यांची आरोग्य तपासणी करणेसाठी आजीवली प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये आजीवली, पोयंजे, कोन, कोळखे, काळुंद्रे, सोमटणे, दहिवली, विचुंबे, देवद, बारवई, मोहोपे, पळस्पे, भातानपाडा, भिंगार या गावातील कोविड-19 मुळे विधवा झालेल्या महीला लाभ घेण्यासाठी उपस्थित होत्या.
या शिबिरामध्ये तालुका विधी सेवा समितीच्या सर्व सेवा, संजय गांधी निराधार योजना, बँक ऑफ इंडिया मुद्रा कर्जाबाबतची माहिती, आदिवासी विभागाच्या योजना, बालसंगोपन योजना, विधवा प्रमाणपत्र, बचत गट स्थापन करणेबाबत माहिती, कृषी विभागाच्या योजना, पोस्ट ऑफिस संबंधीत योजना, वजीर फाउंडेशन मार्फत मोफत शिलाई मशिन प्रशिक्षण आदि योजनांची माहिती संबधीत विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत सविस्तरपणे देण्यात येवून योजनेसंबंधीत कागदपत्रांची पुर्तता करुन घेण्यात आली. यापुढेही प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय शिबीर आपटा, गव्हाण, वावंजे, नेरे आदि ठिकाणी लवकरात लवकर आयोजित करण्यात येतील असे प्रतिपादन तहसीलदार विजय तळेकर यांनी केले.
या वेळी वात्सल्य समितीचे सचिव चेतन गायकवाड, वैद्यकिय अधिकारी प्रभाकर पाटील, ग्राम स्वराज्य समिती अध्यक्ष अल्लाउद्दिन शेख, ग्राम स्वराज्य समिती सदस्य संतोष ठाकूर, जिल्हा विधी सेवा समिती प्रतिनिधी शैलेश कोंडस्कर, अॅड. अस्मिता भुवड, युवा संस्था पनवेलचे चेतन वाघ, बाळकृष्ण नारायण पाटील, विस्तार अधिकारी वैशाली वैद, वनिता वाघ, कार्तिकी मोकाशी, संगिता भगत, वंदना गोंडाणे, ए.बा.वि.से.यो. प्रकल्प पर्यवेक्षिका पुजा चांगोले, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आजीवली येथील विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, एएनएम,एमपीडब्लू व कर्मचारी उपस्थित होते.