Breaking News

राजकीय अस्थिरतेमुळे उद्धव ठाकरेंना उपरती

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबा‘साहेबांचे नाव देण्यास तोंडी सहमती
  • लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय कृती समिती आणि भूमिपुत्रांच्या संघर्षाला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर सहमती दर्शवली आहे. त्यामुळे भूमिपुत्र आणि लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने स्थापन केलेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या लढ्याला मोठे यश आले आहे. दरम्यान, ‘दिबा’साहेबांचे यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासाठी वारंवार मागणी करूनसुद्धा त्याला वाटाण्याच्या अक्षता लावणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता घुमजाव केले आहे. सत्ता जात आल्याचे चित्र नजरेसमोर आल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांना उशिरा शहाणपण सुचल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटत आहे.
भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कष्टकर्‍यांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी लोकचळवळ उभी राहिली. सर्व स्तरांतून तिला पाठिंबा मिळाला. खरेतर ही मागणी सन 2008पासूनची आहे. असे असताना राज्यातील महाविकास आघाडीमधील शिवसेनेने नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येईल, असे जाहीर केले आणि तसा ठराव राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सिडकोमार्फत करून घेतला. ठाकरे यांच्या या भूमिकेचा रायगड, ठाणे, मुंबई, पालघर आदी जिल्ह्यांतील ‘दिबा’प्रेमी नागरिकांनी तीव्र विरोध केला.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी मागील वर्षी 10 जूनला भव्य साखळी आंदोलन, 24 जूनला ऐतिहासिक सिडको घेराव आंदोलन, 9 ऑगस्ट क्रांतिदिनी मशाल मोर्चा, 17 मार्च 2022ला भूमिपुत्र परिषद, सिडको वर्धापन दिनी काळा दिन आंदोलन, 24 जानेवारी 2022ला विमानतळ काम बंद आंदोलन, 24 जून 2022 रोजी सीबीडी बेलापूर येथे सिडको घेराव अशी भव्य आंदोलने केली. 10 जून 2021च्या मानवी साखळी आंदोलनातून भूमिपुत्रांचा राज्य ठाकरे सरकार असंतोष स्पष्टपणे दिसून आला. तरीही बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव विमानतळाला देण्यात येईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. नामकरणासंदर्भात 20 जून 2021 रोजी मुंबईत ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची चर्चेची दुसरी फेरीही मुख्यमंत्र्यांच्या हट्टामुळे फिसकटली होती. या वेळी ठाकरे यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून न घेता ते बैठकीतून उठून गेले होते. जर ‘दिबा’साहेबांच्या नावाला ठाकरे यांचा विरोध नव्हता. मग त्या वेळी त्यांनी विचार का केला नाही, शब्द का दिला नाही असा सवाल उपस्थित होत असतानाच ठाकरे यांचा लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला विरोध असल्याचे स्पष्ट झाले होते. भ
दरम्यान, सर्वपक्षीय सुरू लढा असताना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापचे नेते मात्र ‘दिबां’च्या नावासाठी पुढे आले नाहीत. या काळात त्यांनाही या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते, मात्र त्यांनी ‘दिबां’च्या नावाला कायम विरोध ठेवला, मात्र आता श्रेयासाठी केविलवाणा प्रयत्न सुरू केला गेला आहे, पण भूमिपुत्रांना माहीत आहे या लढ्यात कुणी कुणी साथ दिली आणि कोणाला ‘दिबां’चे त्याग विस्मरणात गेले.
लोकनेते दि. बा. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब, कष्टकरी आणि शेतकर्‍यांसाठी खर्ची घातले. सिडको प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी मोठा लढा उभारला. प्रकल्पग्रस्तांसाठी जासई या ठिकाणी केलेल्या आंदोलनामध्ये काहींना हौतात्म्य पत्करावे लागले. त्यांनी दिलेल्या रक्तरंजित लढ्यामुळे साडेबारा टक्के योजना लागू झाली. त्यामुळे स्थानिकांची आर्थिकदृष्ट्या भरभराट झाली. लोकनेते दि. बा पाटील यांचा त्यागामुळे या परिसरामध्ये आर्थिक सुबत्ता आली. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिकांनी दिलेल्या जमिनींवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येत आहे.
लोकनेते दि. बा. पाटील हे एक मोठा उंचीचे नेते होते. त्यांनी अनेक विषयांवर आणि मुद्द्यांवर लढा आणि संघर्ष केला. खासदार, आमदार आणि विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली. त्यांच्या कार्याची ओळख आगामी पिढ्यांना व्हावी आणि त्यामधून त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भूमिपुत्र व लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष कृती समितीने केली. एवढेच नाही तर व्यापक लढा उभारला. या लढ्यात संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, लोकनेते रामशेठ रामशेठ ठाकूर, माजी मंत्री आमदार गणेश नाईक, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार संदीप नाईक, कॉम्रेड भूषण पाटील, ओबीसी नेते राजाराम पाटील, काँग्रेसचे संतोष केणे, गुलाबराव वझे, नंदराज मुंगाजी, जे. डी. तांडेल, राजेश गायकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, लाखो भूमिपुत्र कायम राहिले आणि या लढ्याला यश आले.

‘दिबां’च्या नावाचा सोयीस्कर विसर पडणार्‍यांची श्रेयासाठी धडपड
‘दिबा’साहेबांचे नाव विमानतळाला देण्यासाठी जासई येथे झालेल्या पहिल्या आणि दुसर्‍या बैठकीला पनवेल, उरण, नवी मुंबईतील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. जसजशा बैठका होत गेल्या तसतसे शिवसेनेचे बबन पाटील, शेकापचे आमदार बाळाराम पाटील, जे. एम. म्हात्रे बैठकीला दिसेनासे झाले. मुळातच महाविकास आघाडी म्हणून त्यांना पक्षश्रेष्ठींकडून आदेश आले आणि शिवसेनेचे बबन पाटील, शिरीष घरत, शेकापचे बाळाराम पाटील, जे. एम. म्हात्रे यांना ‘दिबां’च्या नावाचा सोयीस्कर विसर पडला. समितीच्या माध्यमातून न भुतो न भविष्यति आंदोलने झाली. त्या वेळी ‘दिबां’च्या नावासाठी या महविकास आघाडीतील ही स्थानिक नेतेमंडळी फिरकली सुद्धा नाहीत आणि आता श्रेयासाठी हास्यास्पद धडपड करीत आहेत

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला याचा आम्हाला आनंद आहे, मात्र सिडकोने जो स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव केलेला आहे तो विखंडित करून लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने नवा ठराव करून तो राज्य सरकारकडे पाठवावा आणि ‘दिबां’च्या नावाचा ठराव राज्याने केंद्र सरकारकडे पाठवावा. तरच या निर्णयाची प्रक्रिया पूर्ण होईल. या संदर्भात लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती बुधवारी (दि. 29) सायंकाळी 5 वाजता बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार आहे.
-दशरथ पाटील, अध्यक्ष, सर्वपक्षीय कृती समिती

यापूर्वी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने दोन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्यातील एका बैठकीतून तर मुख्यमंत्री उठून गेले होते, पण आता हरकत नाही. उशिरा का होईना त्यांनी ‘दिबां’चे नाव देण्याचा निर्णय घेतला याबद्दल आनंद वाटला, मात्र त्यांनी आता सिडकोने केलेले ठराव विखंडित करण्याचा आदेश देणे आवश्यक आहे आणि ‘दिबां’च्या नावाचा नवा ठराव केंद्र सरकारला पाठविला पाहिजे.
-लोकनेते रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष,सर्वपक्षीय कृती समिती

24 जून 2021पासून लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने केली जात होती. त्या वेळी प्रकल्पग्रस्तांच्या ताकदीचा अनुभव राज्य सरकारला आला असावा, पण आता रस्त्याला आणि पुलाला ‘दिबां’चे नाव द्यावे, अशी म्हणणारी मंडळी मुख्यमंत्र्यांना भेटतात काय आणि सातत्याने विरोध करणारे मुख्यमंत्री ‘दिबां’च्या नावाला तयार होतात काय
याचे आश्चर्य वाटते. दोन्ही बैठकांमध्ये बाळासाहेबांच्या नावाला विरोध का, असे विचारणारे मुख्यमंत्री आज सांगतात की ‘दिबां’च्या नावाला माझा विरोध नाही, असे म्हणतात. त्यांची भूमिका अशी अचानक कशी बदलली? ही पुतना मावशीची भूमिका तर नाही ना? खरेतर सिडकोने केलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवा, मात्र माझ्या माहितीनुसार अजून तरी त्यांनी तसे आदेश दिलेले नाहीत.
-आमदार प्रशांत ठाकूर, कार्याध्यक्ष, सर्वपक्षीय कृती समिती

विधिमंडळात ‘दिबां’च्या नावाचा गजर
आयुष्याच्या शेवटापर्यंत भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या भविष्यासाठी लढणारे संघर्षमूर्ती लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊन प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा सन्मान करा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, तर शंभर प्रकल्पांना बाळासाहेबांचे नाव द्या, पण नवी मुंबई विमानतळाला फक्त आणि फक्त ‘दिबा’साहेबांचे नाव पाहिजे, अशी जोरदार मागणी आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आठवडा प्रस्तावावर बोलताना सभागृहात केली होती. त्याचप्रमाणे विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या मांडून सरकारचे लक्ष वेधले होते. नाव फक्त ‘दिबा’साहेबांचेच का हवे या संदर्भात भूमिपुत्रांची विस्तृत भूमिका मांडत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळात ‘दिबां’च्या नावाचा गजर केला होता.

‘त्या’ बैठकीत साधा शब्द का नाही दिला? भूमिपुत्रांचा सवाल
मुंबईत मंगळवारी (दि. 28) झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याला माझा विरोध नव्हता, असे सांगितले असले तरी मागील वर्षी समितीच्या समवेत झालेल्या दोन्हीही बैठकीत त्यांनी ‘दिबां’च्या नावाचा शब्द का दिला, असा सवाल उपस्थित होत ठाकरे यांची दुटप्पी भूमिका अधोरेखित झाली. याशिवाय सत्तेच्या गणितात आता डाव एकनाथ शिंदे यांच्यावर फिरवून पलटवार करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. ‘दिबां’च्या नावाबद्दल कधीही होकाराचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्चारला नाही. मग आज मात्र राजकीय अस्थिरतेमुळे उद्धव ठाकरे यांनी अखेर माघार घेण्याचा प्रयत्न दिसून आला. नामकरणासंदर्भात ठाकरे यांना आलेले अपयश आता एकनाथ शिंदे यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला आहे.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply