पोलादपूर : प्रतिनिधी
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पोलादपूर बसस्थानकात असलेल्या गळक्या स्वच्छतागृहाच्या सांडपाण्यासाठी स्थानकाच्या आवारातच खणण्यात आलेल्या खड्ड्यावर नवीन स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. पोलादपूर एसटी स्थानकातील स्वच्छतागृहाचे सांडपाणी पुर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील गटाराला मिळण्यासाठी सिमेंटकाँक्रीटचा पाईप टाकण्यात आला होता. मात्र, चौपदरीकरणाच्या कामात महामार्गालगतचे गटार फोडण्यात आल्यानंतर एसटी स्थानकातील स्वच्छतागृहाचे सांडपाणी स्थानकाच्याच आवारात शोषखड्डा खणून जिरविण्यास सुरूवात झाली. या शोषखड्ड्यावरच नवीन स्वच्छतागृहाची इमारत बांधण्यात आली आहे. या नवीन स्वच्छतागृहाच्या सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी काय उपाययोजना करावी, या संदर्भात महाड एसटी आगाराच्या वाहतूक नियंत्रकांनी पोलादपूर नगरपंचायतीबरोबर चर्चा केली आहे.