पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी (दि. 6) स्वीकृत नगरसेवक, स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड झाली. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत नाट्यगृहात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या निवडी जाहीर करण्यात आल्या.
या सभेत पीठासीन अधिकारी म्हणून महापौर नितीन पाटील यांनी काम पाहिले. सभेला उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, सचिव नानासाहेब कामठे यांच्यासह नगसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
महापालिकेत भाजप महायुतीचे एकूण 59 नगरसेवक विजयी झाल्याने त्यांना पाच स्वीकृत नगरसेवक पदे मिळाली, तर शेकाप-काँग्रेस गट आणि उबाठा गटाला प्रत्येकी एक पद मिळाले. महायुतीकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहाचा दांडगा अनुभव असलेले युवा नेते परेश ठाकूर, अॅड. प्रथमेश सोमण, गणेश कडू, डॉ. अरुणकुमार भगत, दिनेश खानावकर यांची, शेकाप-काँग्रेस गटातून प्रकाश म्हात्रे आणि उबाठा गटातून नितीन गावंड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
संख्याबळानुसार स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीमध्ये भाजप महायुतीला 12, शेकाप काँग्रेस गटाला तीन आणि उबाठा गटाला एक सदस्यपद ग्राह्य झाले. यात महायुतीकडून प्रवीण पाटील, मधू पाटील, समीर कदम, बबन मुकादम, रवींद्र भगत, विजय खानावकर, हेमलता गोवारी, रवींद्र जोशी, राजेश्री वावेकर, अॅड. मनोज भुजबळ, रूचिता लोंढे आणि अजय बहिरा, शेकाप-काँग्रेस गटाचे अरविंद म्हात्रे, हरेश केणी, तुषार पाटील तसेच उबाठा गटातून प्रिया गोवारी यांची निवड झाली आहे.
महिला व बाल कल्याण समितीसाठी भाजप महायुतीमधून लीना म्हात्रे, अनिता पाटील, सोनल नवघरे, बायजा बारगजे, प्रतिभा भोईर, सरस्वती काथारा, शिला भगत, कुसुम पाटील, अस्मिता घरत, ममता म्हात्रे, रूचिता लोंढे, प्रियंका कांडपिळे, शेकाप-काँग्रेस गटातून योगिता फडके, मनिषा म्हात्रे, अर्चना भोईर, तर उबाठा गटातील मेघना घाडगे यांची निवड झाली आहे.
महाविकास आघाडीतून लीना गरड यांच्या नेतृत्वाखाली उबाठा गटाने फारकत घेतल्याने या आघाडीत अंतर्गत मतभेद आणि बिघाडीचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय घडामोड विशेष चर्चेचा विषय ठरली. सभा सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षाकडून विमानतळाच्या नामकरणासंदर्भात लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न झाला, मात्र याच विरोधी पक्षाने लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाला कडाडून विरोध केला होता. ‘दिबां’च्या नावासाठी झालेल्या लढ्यात आपण सहभागी झालो नाही याचा जाणीवपूर्वक विसर त्यांना पडला होता. त्यामुळे विरोधी पक्षाने सभागृहात स्वतःचे हसे करून घेतले.
याशिवाय सभेच्या विषय पत्रिकेनुसार कामकाज सुरू करताना शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी मध्येच गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सभागृह नेता, विरोधी पक्षनेता निवडीबद्दल नियमाची मांडणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र सचिवांनी कायद्याच्या बाबी अधोरेखित करून विषय पत्रिका योग्य असल्याचे नमूद केले. यावेळी सभागृहाच्या कामकाजात नेहमीच विरोधी भूमिका घेणार्या अरविंद म्हात्रे यांच्या भूमिकेवर महापौर नितीन पाटील यांनी सडेतोड भाष्य केले. कायम तुम्ही विरोधी पक्षातच राहावे, असे स्पष्ट वक्तव्य करीत त्यांनी विरोधी पक्षाची बोलतीच बंद केली.
सभेच्या शेवटी नगरविकास सचिवांनी अधिकृतपणे सभागृहाचे कामकाज संपल्याची घोषणा केली, मात्र त्यानंतरही अरविंद म्हात्रे यांनी अनावश्यक गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे विरोधी पक्षाला सभागृहाच्या कामकाजाबाबत पुरेशी अभ्यासपूर्ण माहिती नसल्याचे या सभेच्या माध्यमातून अधोरेखित झाले.
Check Also
रिटघर येथे लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवी वर्ष शुभचिंतन समारंभ उत्साहात
विद्यालयासाठी ४० लाखांची घोषणा पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, थोर देणगीदार, …
RamPrahar – The Panvel Daily Paper