मुंबई : प्रतिनिधी
राज्यात अतिवृष्टी होऊन अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे, तर शेतकर्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. सध्याचे नैसर्गिक संकट लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत. या वेळी संकटात सापडलेल्या नागरिकांना तसेच शेतकर्यांना मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पैसे न भरल्यामुळे काही गावांचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. या संदर्भात आम्ही आज बैठक घेतली. 2018 साली आपण मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना सुरू केली होती. दिवसा शेतकर्यांना वीज देण्याचे नियोजन होते. त्या काळात साधारण 200 मेगावॅटचे काम आपण पूर्ण केले होते, तर काही काम प्रगतिपथावर होतं. नंतरच्या काळात त्याला थोडा ब्रेक लागला. ही योजना आम्ही पुन्हा एकदा फास्ट ट्रॅकवर आणली आहे. पुढच्या एका वर्षात किमान 30 टक्के अॅग्रीकल्चर फिडर सौरउर्जेवर कसे आणता येतील यावर आम्ही निर्णय घेतला आहे. त्याचा संपूर्ण आराखडा मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी आम्ही पाठवत आहोत.
ग्रामीण भागातील वीज बिल थकबाकी आणि पाणीपुरवठा योजनेबद्दलही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली. अनेक भागांत पिण्याच्या पाण्याच्या योजना तसेच पथदिवे हे बिल न भरल्यामुळे बंद आहेत. या बिलावर व्याज वाढत असल्यामुळे महावितरणची थकबाकी वाढत आहे. गावानांदेखील अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जुनी सगळी थकबाकी एकरकमी भरणा करण्याच्या दृष्टीने महावितरण आणि राज्य सरकारने विचार करून सरकारने ही थकबाकी भरावी. सरकारने केलेल्या मदतीतून ग्रामपंचायतींनी बिले भरावीत आणि योजना सुरू कराव्यात याबाबतही एक निर्णय घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
2019 सालापासून सव्वा लाख शेतकर्यांनी कृषी पंपांसाठी अर्ज केलेला आहे. या सर्वांना केंद्र सरकारची कुसुम आणि राज्य सरकाच्या योजनेच्या मध्यमातून जेथे शक्य आहे तिथे सौरपंप देण्याची योजना तयार करून मुख्यमंत्र्यांकडून सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर कशा चालवल्या जातील यावर विचार सुरू आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील अतिवृष्टीबाधित लोकांच्या मदतीसाठी राज्य सरकार काय पावले उचलत आहे याबाबत माहिती दिली. ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्या ठिकाणचे पंचनामे करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. ज्या ठिकाणी कोणी मृत्युमुखी पडला असेल तिथे एनडीआरएफच्या माध्यमातून मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त सातत्याने आढावा घेऊन त्या त्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …