Breaking News

सीकेटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त
मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व अधिक आहे. शिक्षण कधीही वाया जात नाही आणि आयुष्यात शिकण्यासारखे प्रचंड आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे वित्त आणि लेखाधिकारी सीए डॉ. प्रदीप कामथेकर यांनी बुधवारी
(दि. 13) खांदा कॉलनी येथे केले. ते विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात (स्वायत्त) प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष पदवी व पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा बुधवारी संस्थेचे स्फूर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता.
संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर डॉ. कविता चौतमोल उपस्थित होत्या. त्याचबरोबर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय भगत, सचिव डॉ. एस. टी. गडदे, प्राचार्य डॉ. एस. के. पाटील आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.
डॉ. प्रदीप कामथेकर यांनी पुढे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात माणसाने आयुष्यात नेहमी सक्रिय विद्यार्थी बनून सातत्याने अभ्यास करीत ज्ञानसंपादन केले पाहिजे, असे सांगतानाच 100 टक्के प्रयत्न म्हणजेच यशाची खात्री असल्याचे अधोरेखित केले. त्याचप्रमाणे आई-वडिलांचे ऋण लक्षात ठेवले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यात सर्व पालक व गुणवंत विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य  प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी कौतुक केले व महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रा. डॉ. आर. व्ही. येवले, प्रा. डॉ. जी. एस. तन्वर, प्रा. ए. व्ही. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, उपस्थितांचे आभार प्रा. एस. एन. परकाळे यांनी मानले. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी परिषद तथा विद्यार्थी कल्याण कक्षाच्या अध्यक्ष डॉ. एम. ए. म्हात्रे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. बी. डी. आघाव व महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. आर. डी. म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रत्येक विद्यार्थ्याने उत्तुंग उद्दिष्ट ठेवले पाहिजे -लोकनेते रामशेठ ठाकूर
या सोहळ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने उत्तुंग उद्दिष्ट ठेवले पाहिजे, असे नमूद करीत त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. स्वर्गीय चांगू काना ठाकूर यांचे पुण्यस्मरण आणि त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आयोजिलेल्या या कौतुक सोहळ्यामध्ये पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply