आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने कोन, भिंगार, वारदोली या ग्रामपंचायत विभागातील वायरमन व लाईनमन यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे केली आहे.
या संदर्भातील निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायतळकर, उप कार्य अभियंता एम. बी. राख, श्री. झिल्लारे यांच्याकडे भिंगार ग्रामपंचातीचे माजी सरपंच योगेश लहाने, महेश लहाने, नरेश लहाने, सुधीर लहाने यांनी सुपूर्द केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल तालुक्यातील कोन, भिंगार, वारदोली या ग्रामपंचायत हद्दीतील भिंगारवाडी, भिंगार, शेडूंग, भेरले, बारदोली, बेलवली, ठाकूरवाडी, सांगडे, बोर्ले, अजिवली, कोन या गावांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने गेल्या दिड ते दोन महिन्यांपासून वायरमन व लाईनमन ही दोन्ही पदे रिक्त असल्यामुळे सध्याच्या मुसळधार पडत असलेल्या पावसाची परिस्थिती पाहता नागरिकांना विद्युत संदर्भातील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्या अनुषंगाने विभागातील ग्रामस्थांनी विद्युत मंडळाच्या अधिकार्यांकडे प्रत्यक्ष बाब निदर्शनास आणून सुद्धा अद्यापपर्यंत ही पदे रिक्त आहेत.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता आणि विभागात सध्या पावसाळयाची परिस्थिती पाहता तातडीने वायरमन व लाईनमनची रिक्त पदे भरण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही व्हावी, असे या निवेदनात म्हटले आहे.