नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा रंगली आहे. रॉबर्ट वाड्रा यांनी नुकताच लिहिलेल्या एका फेसबुक पोस्टवरून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथून ते निवडणुकीस उभे राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासंबंधीचे पोस्टर्स युवक काँग्रेसच्या वतीने लावण्यात आले आहेत. यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी राजकीय सर्कशीत जोकरचाच प्रवेश बाकी होता, आता तोही दिसत आहे, अशा शब्दांत त्यांनी वाड्रा यांना टोला लगावला आहे. मुरादाबाद लोकसभा मतदारसंघात वाड्रांच्या उमेदवारीबाबत युवक काँग्रेसने पोस्टर्स लावले आहेत. रॉबर्ट वाड्राजी मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तुमचे स्वागत आहे, असे पोस्टरवर म्हटले आहे. नक्वी पुढे म्हणाले की, रॉबर्ट वाड्राजी मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या आपल्या निर्णयाचे स्वागत आहे. हे पी-आर (प्रियंका-राहुल) राजकीय सर्कस आहे. या पी-आर राजकीय सर्कशीत जोकरचाच प्रवेश राहिला होता. आता जोकरचा प्रवेशही दिसून येत आहे.
तत्पूर्वी रॉवर्ट वाड्रा यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात काम करण्याचा आपला अनुभव चांगला असल्याचे म्हटले आहे. आपल्यावर झालेले सर्व आरोप संपुष्टात आल्यानंतर मोठ्या भूमिकेत येऊन लोकांच्या सेवेसाठी स्वत:ला समर्पित करण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या ते मनी लाँडरिंगप्रकरणी ईडीच्या चौकशीचा सामना करीत आहेत.