Breaking News

रायगडचा हिंगोलीवर दणदणीत विजय

क्रिश पाटील, नैतिक सोळंकी यांची शतके; आमंत्रितांची क्रिकेट स्पर्धा

अलिबाग ः प्रतिनिधी

पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 16 वर्षांखालील मुलांच्या आमंत्रितांच्या स्पर्धेत पहिल्या साखळी सामन्यात  रायगडने हिंगोलीवर एक डाव व 142 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात निर्णायक विजय मिळवून रायगडने पूर्ण गुण वसूल केले. हिंगोली संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांचा हा निर्णय चुकला. रायगडने हिंगोलीचा डाव 44.2 षटकांत 157 धावांमध्ये गुंडाळला. त्यानंतर रायगडने आपला पहिला डाव 73 षटकांत 8 बाद 424 या धावसंख्येवर घोषित केला. पहिल्या डावात 267 धावांची भक्कम आघाडी घेऊन रायगडने हिंगोली संघाचा दुसरा डाव 125 धावात गुंडाळला.  हिंगोलीच्या पहिल्या डावात निलय सावंत या फिरकी गोलंदाजाने  भेदक गोलंदाजी करून 4.2 षटकात 13 धावा देत हॅट्ट्रिकसह चार बळी घेतले. राहुल सिंग या फिरकी गोलंदाजाने 12 षटकांत 30 धावांत तीन गडी बाद केले. रायगडच्या पहिल्या डावात क्रिश पाटील व नैतिक सोळंकी याने शतक ठोकले. क्रिशने 98 चेंडूंचा सामना करून 19 चौकार व दोन षटकारांसह 132 धावांची खेळी केली, तर नैतिकने 118 चेंडूंना सामोरे जात  23 चौकार व एक षटकारासह नाबाद 124 धावा केल्या. अमेय पाटील (57 धावा) व स्मित पाटील (33 धावा) यांनी देखील चांगली फलंदाजी केली. राहुल सिंग व ओम म्हात्रे (प्रत्येकी तीन बळी) यांनी भेदक गोलंदाजी करून हिंगोली संघाचा दुसरा डाव 38.2 षटकात 125 धावात संपवला. या सामन्यात दोन्ही डावांत मिळून राहुलने सहा बळी घेतले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या सभागृह नेतेपदी अ‍ॅड. प्रकाश बिनेदार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या सभागृह नेतेपदी भाजपचे अनुभवी नगरसेवक अ‍ॅड. प्रकाश बिनेदार यांची निवड …

Leave a Reply