अलिबाग : प्रतिनिधी
तालुक्यातील माणकुळे ग्रामपंचायतीचे भाजपचे सरपंच सुजित गावंड यांच्यासह निवडून आलेल्या चार सदस्यांविरोधात विरोधकांनी दाखल केलेला अपात्रतेचा दावा जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे.
माणकुळे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 27 मे 2018 रोजी झाली होती. त्यावेळी थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत सुजीत गावंड यांनी 119 मतांनी सुभाष पाटील यांचा पराभव केला होता. सुजीत गावंड यांच्यासह अभय म्हात्रे, सुदेष्णा थळे, योजना ठाकूर हे सदस्य भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते, तर काँग्रेसच्या तिकीटावर दिशा पाटील यांचा विजय झाला होता. या सर्वांविरोधात शेकापचे उमेदवार सुभाष पाटील यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. विजयी उमेदवारांनी शौचालयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, मालमत्तेची माहिती चुकीची दिल्याने त्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी करण्यात आली होती. जिल्हा न्यायालयाने हा दावा बाद ठरवला आहे. या निकालाने सुजीत गावंड यांचे सरपंचपद अबाधीत राहिले आहे. तर अन्य चार सदस्यांनाही आपला कार्यकाळ पूर्ण करता येणार आहे.
सरपंच सुजीत गावंड यांच्या वतीने अॅड. अंकित बंगेरा, अॅड. जे. टी. पाटील, अॅड. श्रद्घा ठाकूर यांनी न्यायालयात बाजू मांडली.
भाजपचे अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघ सरचिटणीस अॅड. परेश देशमुख, अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, उपाध्यक्ष राजेश पाटील, सरचिटणीस परशुराम म्हात्रे, सुनील थळे, चेतन ठाकूर, अनिल थळे, आदित्य नाईक, भुमित गाला यांनी सुजित गावंड, तसेच त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन केले.