मुरूड : प्रतिनिधी
दमदार पावसामुळे बाजारात रानभाज्या विक्रीसाठी आल्या असून औषधी गुणांमुळे खवय्यांची त्यास पसंती लाभत आहे. यातून कष्टकरी, आदिवासींना पावसाळी हंगामात रोजगाराचे साधनही उपलब्ध झाले आहे.
कोकणाला मोठे वनक्षेत्र लाभल्याने विविध प्रकारच्या औषधी वनस्पती या प्रांतात आढळतात. याचबरोबर आरोग्यवर्धक रानभाज्या पावसाळ्यात उगवतात. पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीने खाल्या जातात. वर्षभर मेथी, शेपू, पालक, लाल माठ यांसारख्या नेहमीच्या पालेभाज्या खाणारे लोक पावसाळ्यात रानभाज्यांची चव आवर्जून चाखतात.
विशेष म्हणजे या भाज्यांची खास लागवड करावी लागत नाही. निसर्गक्रमानुसार त्या जंगलात उगवतात. करटोली, भारंगा, कुडा, कुळू, शेवळं, टाकळा, आघाडा अशा वर्षातून पावसाळी हंगामात एकदा मिळणार्या रानभाज्या सध्या बाजारात आल्या आहेत. या भाज्यांमध्ये लोह, तंतुमय पदार्थ व इतर खनिजे विपूल प्रमाणात आढळतात. त्यामुळे या रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त समजल्या जातात. आता इंटरनेटवर, समाजमाध्यमांवरही या रानभाज्यांची महती वाचायला मिळते. त्यामुळे या भाज्यांची लोकप्रियता वाढली आहे.
रानभाज्या म्हणजे आदिवासी मंडळींसाठी जगण्याचा मोठा आधार. जंगलांवर उपजीविका करणार्या आदिवासींना या पावसाळी भाज्यांची चांगली ओळख असते. त्यावर त्यांची घरे चालतात. या भाज्यांना हल्ली चांगली मागणी असल्याने आदिवासींचा चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह होत आहे.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …