रायगड जिल्ह्याच्या शहीद परंपरेची सुरुवात पोलादपूर तालुक्यातील दुसर्या महायुध्दातील पहिले शहीद खडपी येथील सयाजी जाधव यांच्यापासून झाली असून त्यानंतर कोंढवीचे अनाजी चव्हाण, भरत मोरे, लक्ष्मण निकम, चिखलीचे तानाजी बांदल, परसुलेचे बाबूराम जाधव, लोहारे पवारवाडीतील सुरेश भोसले, वाकण धामणेचीवाडीतील देऊ सकपाळ,
पार्लेतील लक्ष्मण गमरे, तुर्भे खोंडा येथील गणपत पार्टे, आडावळे येरंडवाडीतील गणपत सालेकर, देवपूर येथील संदीप महाडिक, काटेतळीतील गणपत सकपाळ, पोलादपूरमधील राकेश सावंत अशी शहिदांची परंपरा कोतवाल रेववाडी येथील दिलीप नारायण शिंदे आणि गोळेगणी येथील सुरज मोरे यांच्या बलिदानाने सुरू राहिली. पोलादपूर शहरामध्ये शहीद स्तंभ उभारण्यासाठी पत्रकारांनी आग्रही भूमिका घेतली असता नायक मराठा भवनाच्या नियोजित इमारतीच्या भूमिपूजनावेळी शहीद स्तंभासाठीही भूमिपूजन करण्यात आले आहे.
पहिले शहीद सयाजी ग. जाधव
रायगड जिल्ह्याच्या शहीद परंपरेची सुरुवात यांच्या बलिदानाने नोंदली गेली. अत्यंत गरीब अशा परिस्थितीत असल्याने पारतंत्र्याच्या काळात त्यांना पोलादपूर तालुक्यातील गोर्या अधिकार्यांनी सैन्यात भरतीसाठी हेरले. लष्करी प्रशिक्षणासाठी सयाजी जाधव यांना बेळगाव येथील मराठा लाइट इन्फ्रंट्रीमध्ये पाठवण्यात आले. तब्बल दीड-दोन वर्षांच्या ट्रेनिंगनंतर लष्करी शिपायाच्या पगडी, पायबंद, विजार आणि सदरा अशा पेहरावात सयाजी जाधव पोलादपूर पेठेच्या खडपी गावात आले आणि त्यांच्या शिस्तबध्द वागणुकीने सारा तालुका कौतुकाने पाहू लागला. त्यांच्यासोबत पोलादपूरमधील अनेक तरुण गोर्या अधिकार्यांनी लष्करी प्रशिक्षणासाठी बेळगाव तसेच सागर मध्य भारत येथे धाडले होते, पण ट्रेनिंगहून परत आलेले सयाजी हे पहिलेच आकर्षण ठरले. या काळात सयाजी गणपत जाधव यांचे खडपीतील भिकूबाई यांच्यासोबत लग्न लावण्यात आले. त्यानंतर काही दिवसांतच सयाजी जाधवांना दुसर्या महायुध्दासाठी द. आफ्रिकेमध्ये ब्रिटिश सैन्यातून नेण्यात आले. 18 जून 1942 रोजी ते लढाईत शहीद झाल्याची माहिती त्यावेळी गोर्या अधिकार्यांनी त्यांच्या छायाचित्रासह त्यांच्या पत्नी भिकूबाई यांना दिली. सयाजी जाधव यांना लग्न होऊन तातडीने दुसर्या महायुध्दासाठी रवाना व्हावे लागून वीरमरण आले. त्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांच्या पत्नी भिकूबाई या खडपीच्याच. त्यांच्या बहिणीचे पतीही युध्दात शहीद झाले. त्यामुळे दोघी खडपी येथेच परंतु माहेरी राहू लागल्या. 2006 साली गेल्या वर्षी भिकूबाई यांचे साधारणत: 78व्या वर्षी निधन झाले. त्यांचे उत्तरकार्य त्यांचा पुतण्या शाम गोविंद जाधव याने केले.
शहीद गणपत रघुबा सालेकर
गणपत सालेकर वयाच्या 16व्या वर्षीच मराठा इन्फ्रंट्रीमध्ये 26 जुलै 1946 रोजी भरती झाले. त्यांनी लष्करात बी. जी. मेडल, सेवा मेडल, काश्मीर क्लेप्स मेडल, नेफा जी. एस. मेडल अशी चमकदार कामगिरी करीत हवालदार पदापर्यंत बढती मिळविली. यादरम्यान त्यांचे लग्न नर्मदाबाई यांच्यासोबत झाले. पत्नी नर्मदाबाई मूळच्या आडावळे खुर्दच्या, तर गणपत सालेकर हे जवळच्याच सडे-मोरसडे गावातील रहिवासी होते. त्यांना दोन मुली झाल्या. नर्मदाबाई त्यांची बहीण शांताबाई तुकाराम करंजे यांच्याकडे राहू लागल्या. भारत-चीन युध्दानंतर गणपत सालेकर यांची खुशाली कळून येत नव्हती. तब्बल 10 वर्षांनंतर फेब्रुवारी 1972मध्ये लष्करातील एक जवानांची तुकडी आडावळे खुर्द येथे आली. त्यांनी हवालदार गणपत सालेकर यांना भारत-चीन युध्दात वीरमरण आल्याची 19 नोव्हेंबर 1962 ही तारीख नर्मदाबाईंना सांगितली. गणपत सालेकर यांचे उत्तरकार्य 10 वर्षांनंतर आडावळे सोनारवाडीत झाले. याच ठिकाणी लष्कराने नर्मदाबाईंना 15-20 दिवसांत घर बांधून दिले, मात्र नर्मदाबाई आजतागायत त्यांची बहीण शांताबाई करंजे यांच्याकडे सोबतीसाठी राहत आहेत. शासनाने आणि लष्कराने त्यांना पुष्कळ आर्थिक मदत दिली. नर्मदाबाईंकडे गणपत सालेकर यांचे छायाचित्रही नाही. त्यांना लष्कराने बांधून दिलेले घर सध्या जीर्णावस्थेत असून तेथे कोणीही राहत नाही.
शहीद गणपत पार्टे
गणपत पार्टे यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1942 साली झाला. लान्स नायक पदावर असताना भारत-पाक युध्दामध्ये 21 नोव्हेंबर 1971 साली गोळी लागून ते धारातीर्थी पडले. स्वत: घरच्या गरिबीला कंटाळून मुंबईत गिरणी कामगार म्हणून नोकरीस गेले. शिक्षण जेमतेम होते. त्यामुळे गिरणी कामगारांच्या जीवनात स्वारस्य नव्हते. स्वत:हून कुलाबा येथे 24 ऑक्टोबर 1962मध्ये भरती झाले. मराठा लाइट इन्फ्रंट्री, बेळगाव युनिटमध्ये सैन्याचे प्रशिक्षण घेऊन लान्स नायकपदापर्यंत प्रगती केली. भारत-पाकिस्तान युध्दावेळी पंजाबात गेले होते. तेथे त्यांनी शत्रूंवर हल्ला चढवला. यात प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला असता गणपत पार्टे शहीद झाले. पत्नी जनाबाई गणपत पार्टे मूळच्या मोरसडे गावाच्या माहेरवाशीण. गणपत पार्टे शहीद झाल्यानंतर तेव्हा मुलगा अनिल आणि मुलगी शकुंतला उर्फ शकुबाई यांना धीराने वाढविले. त्यावेळी सासू-सासर्यांनाही आधार दिला. गणपत पार्टे यांच्या बलिदानानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सहीचे 1 जानेवारी 1972चे पत्र जनाबाईंनी आजही जपून ठेवले आहे. सरकारकडून पाच एकर वरकस जमीन मिळाली. सासूबाईंच्या नावे पेन्शन सुरू झाली. त्यांच्यानंतर जनाबाईंना पेन्शन मिळू लागली. मुलगा अनिल सध्या मुंबईत, तर मुलगी शकुबाई चांढवे येथे दिली आहे. तीदेखील सध्या मुंबईत आहे. जनाबाई तुर्भे खोंडा भागात शेती-घरकामाकडे लक्ष देतात. गणपत पार्टे यांचा पुतळा त्यांना मिळालेल्या जमिनीवर आहे.
शहीद लक्ष्मण दगडू गमरे
शहीद लक्ष्मण दगडू गमरे यांचा जन्म 19 डिसेंबर 1942 रोजी झाला. महाड येथे 19 डिसेंबर 1961 रोजी सैन्यात भरती झाले. तेव्हा पहिली इयत्तेपर्यंत शिक्षण घेतले होते. 19व्या वर्षी सैनिकी शिक्षण घेताना जम्मू-काश्मीर, कच्छ, नेफा या भागात सेवाही केली. शिपाई पदावरच पहिल्या महार रेजिमेंटमध्ये होते. सैन्य सेवा मेडल, सेवा मेडल, हिमालय रक्षा मेडल 1965 अशी पदके मिळवितानाच लक्ष्मण गमरे यांचे लग्न सेवाकाळातच झाले. पत्नी शोभा लक्ष्मण गमरे यांना संजय हा मुलगा झाला. तो वर्षभराचा असताना भारताने पाकिस्तानवर हल्ला केला. त्यावेळी पंजाबमध्ये पहिली महार रेजिमेंट होती. रेजिमेंटच्या वाय कंपनीतून लक्ष्मण गमरे तर डब्ल्यू कंपनीतून त्यांच्या गावातील तुकाराम सकपाळ हे सोबती होते. 10 डिसेंबर 1971च्या रात्री पाकिस्तानी सैन्याने पंजाब सीमेवर भारतीय हल्ल्याला उत्तर दिले. या वेळी गोळीबारात गमरे शहीद झाले. पेन्शन पत्नीला मिळते.
शहीद देऊ दाजी सकपाळ
पोलादपूर तालुक्यातील धामणेची वाडी या वाकण बुद्रुक गावाच्या बारा वाड्यांपैकी एका दुर्गम वाडीवर सकपाळांचे एकच कुटुंब स्वातंत्र्यपूर्व काळात वास्तव्य करून होते. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या लढवय्येपणाची पार्श्वभूमी असलेल्या या परिसरात ब्रिटिश काळामध्ये रांगडे, कणखर तरुण लष्करात भरतीसाठी नेले जात असत. देऊ दाजी सकपाळ यांचे घराणे हे वाकण धामणेची वाडीतील एकमेव सकपाळ कुटुंब होते. शरीरयष्टी मजबूत असूनही घरातील गरिबी आणि हलाखीची परिस्थिती या पार्श्वभूमीवर ते कधी सैन्यात भरती होण्यासाठी गेले हे त्यांचे भाऊ शंकर सकपाळ यांच्यासह वडील दाजी सकपाळ यांच्याही स्मरणात आले नाही. 21 जुलै 1943 रोजी वयाच्या 18व्या वर्षीच देऊ सकपाळ ब्रिटिश सैन्यात शिपाई पदावर भरती झाले. 5 मराठा लाइट इन्फ्रंट्रीमध्ये ते बेळगावमध्ये ट्रेनिंग घेऊन पहिल्यांदा वाकण येथे परतले. तेव्हा त्यांचे लग्न वाकणच्याच शांताबाई राघू साने यांच्यासोबत झाले. शांताबाई त्यावेळी खूपच लहान वयाच्या होत्या. दाजी सकपाळ सासरे आणि शंकर सकपाळ दीर तसेच सकपाळ कुटुंबात राहून शांताबाईंचे लहानपण लग्नानंतर दोन-तीन वर्षे गेले. तेव्हा देऊ सकपाळ जम्मू-काश्मीरमध्ये मोहिमेवर तैनात होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने ब्रिटिशांची सैन्यावरील सत्ता सार्वभौम भारतास बहाल झाली. अशातच पाकची फाळणी झाल्यावर काश्मीरचा राजा हरिसिंग यांच्या मदतीस भारतीय सैन्य पाठविण्याचा निर्णय झाला. भारताच्या या मोहिमेदरम्यान शिपाई देऊ सकपाळ यांना 21 मे 1948 रोजी वीरमरण आले, मात्र त्यांचे पार्थिव घरी परत आले नाही. शांताबाईंचे वय पती निधनावेळी 18 वर्षांचे होते. त्यावेळी त्या वडील राघू साने यांच्याकडे राहण्यास आल्या. काही वर्षांपूर्वी एक लाखाची मदत आली. त्यांना मूलबाळ नव्हते. तरीही त्यांनी उर्वरित आयुष्य देऊ सकपाळ यांच्या वीरपत्नी म्हणून कंठित केले. (पूर्वार्ध)
– शैलेश पालकर