नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने सुट्या धान्यावरील पाच टक्के जीएसटी मागे घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्वीट करून हा याबाबत माहिती दिली. यानुसार सुट्या डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी यावर पाच टक्के जीएसटी लागणार नाही.
जीएसटी लागू झाला तेव्हा ब्रँडेड तृणधान्ये, डाळी आणि मैदा यावर पाच टक्के जीएसटी लावण्यात आला होता. नंतर यामध्ये बदल करण्यात आला आणि जीएसटी फक्त नोंदणीकृत ब्रँडवर लावला गेला, पण अनेक ब्रँड्सनी त्याचा गैरवापर केला आणि या वस्तूंवरील जीएसटीच्या महसुलात मोठी घट झाली. यामुळेच जीएसटी परिषदेच्या मागील बैठकीत या वस्तूंच्या प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या स्वरूपात विक्रीवर जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर आता केंद्राने खुल्या धान्यावरील जीएसटी मागे घेऊन दिलासा दिला आहे.
जीएसटीबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. खाद्यपदार्थांवर प्रथमच कर लावण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे, मात्र यात तथ्य नाही. जीएसटी लागू होण्याआधीच राज्ये अन्नधान्यावर महसूल गोळा करीत होते.
-निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री