नागोठणे, पाली : प्रतिनिधी
नागोठणे जवळील आंबेघर येथील प्रणय केशव बडे (वय 27) या तरुणाने सोमवारी (दि. 29) संध्याकाळी स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना पालीमध्ये घडली आहे. त्यात तो 90 टक्के भाजल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला.
प्रणय याचे पाली येथील प्रिती (वय 26, नाव बदलले आहे) सोबत पाच वर्षापासून प्रेम संबंध होते. दोघांनी लग्न करण्याचे ठरवले होते. मात्र मुलीच्या घरच्यांचा त्याला विरोध होता. सोमवारी प्रणय प्रितीच्या घरी पाली येथे गेला असता, तिच्या घरच्यांनी त्याला लग्न लाऊन देण्यास नकार दिला. त्यामुळे निराश झालेल्या प्रणयने प्रितीच्या घराबाहेर स्वतःला पेटवून घेतले. आसपासच्या लोकांनी त्याला तात्काळ पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी प्रणयला मृत घोषित केले.
या प्रकरणी पाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणी प्रणयच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करून या घटनेची सखोल चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.