पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, नवीन पनवेल (स्वायत्त) हे नेहमीच समाजाबद्दल असणार्या उत्तरदायित्वाप्रती सजग आणि संवेदनशील असते. याच भावनेतून दरवर्षीप्रमाणे संस्थेच्या सीकेटी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रविवारी (दि. 22) कुष्ठरोग निवारण समिती, शांतिवन-नेरे येथे कुष्ठरोग बांधवांसोबत रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून रक्षाबंधन साजरे केले व समितीच्या वृद्धाश्रमास मिष्ठान्न व फळांचे वाटप करण्यात आले.
कुष्ठरोग निवारण समितीच्या न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रम व्यासपीठावर कुष्ठरोग निवारण समितीचे कार्याध्यक्ष अॅड. प्रमोद ठाकूर, सचिव विनायक शिंदे, सीकेटी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे आदी उपस्थित होते. समितीचे कार्याध्यक्ष अॅड. प्रमोद ठाकूर यांनी सभागृहातील उपस्थितांना संबोधित करीत असताना ऐतिहासिक दाखल्यांचे संदर्भ देत रक्षाबंधन दिनाचे महत्त्व विषद केले. हे सांगत असताना त्यांनी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत, महाविद्यालयाशी असणार्या घनिष्ठ ऋणानुबंधाचा उल्लेख केला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे यांनी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सामाजिक बांधिलकीशी असलेल्या दृढ निष्ठेचा उल्लेख केला. याबरोबर संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांचे, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत. ज्ञा. बर्हाटे, उप-प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांच्या प्रोत्साहनपर सहकार्याबद्दल गौरवोद्गार काढून शांतिवन केवळ कुष्ठरोगाचे निवारण कार्य करीत नसून तरुण, युवा मनांवर संस्काराचे रोपण कार्य पार पाडत आहे, असे प्रतिपादन केले.
सभागृहातील औपचारिक कार्यक्रमानंतर महाविद्यालयातील स्वयंसेविकांनी कुष्ठरुग्णांना राखी बांधून त्यांच्याप्रती आपलेपणाची भावना जागवली. त्यानंतर समितीच्या वृद्धाश्रमाला राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांच्या उपस्थितीत मिष्ठान्नाचे व फळांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे, प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार, प्रा. आकाश पाटील, प्रा. अपूर्वा ढगे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी कौतुक केले.