पनवेल : रामप्रहर वृत्त
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील फियाबिला इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मधील कामगारांना कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली फियाबिला एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून भरघोस पगारवाढ व सोयीसुविधा देण्याचा करार झाला. नेलपॉलिश बनविणार्या या फियाबिला कंपनीत यापूर्वी अनेक वर्षांपासून कामगार काँगेसची युनियन होती, मात्र ही संघटना कामगारांचे प्रश्न सोडविण्यास असमर्थ ठरली. त्यामुळे येथील कामगारांनी भाजप उत्तर रायगड कामगार सेलचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांचे नेतृत्व स्विकारले. घरत यांनी या संदर्भात विशेष लक्ष देत व्यवस्थापन व कामगारांच्यात सतत समन्वय साधला. त्या अनुषंगाने एक वर्षांपासून प्रलंबित असलेला पगारवाढ व इतर सुविधांचा करार घडवून आणला. तीन वर्षांच्या करारानुसार कामगारांना पहिल्या वर्षात दरमहा सहा हजार, दुसर्या व तिसर्या वर्षी प्रत्येकी दोन हजार दरमहा, अशी दरमहा पगारवाढ, तसेच दोन लाख 50 हजाराची मेडिक्लेम पॉलिसी, वार्षिक 35 सुटी, सहलीसाठी रक्कम, 16 टक्के बोनस, आदी लाभ देण्याचे मान्य करण्यात आले आहे. या वेळी संघटनेच्यावतीने कामगार नेते जितेंद्र घरत, व्यवस्थापनाच्या वतीने व्यवस्थापक श्री त्रिवेदी, रविंद्र नायर, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, कार्यालयीन सचिव समिरा चव्हाण, युनिट उपाध्यक्ष रुपेश मढवी, राजनाथ राजभर, नलिनी शिवकर, गुलाब पाटील, नकुल पाटील, आनंद गोंधळी, राजेश पुशिलकर, नसरुद्दिन शेख आदी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांचे प्रश्न प्रलंबित होते. तरी सुद्धा कामगार काँग्रेस संघटना त्याकडे लक्ष देत नव्हते. कामगार नेते जितेंद्र घरत यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कामगारांना न्याय मिळाला आहे. त्यामुळे कामगारांनी त्यांचे आभार व्यक्त केले.