खालापूर ः प्रतिनिधी
उरण विधानसभा मतदारसंघात 2019ची निवडणूक लढवत असताना उरणला पनवेलसह खालापूर तालुकाही जोडला गेला. त्यामध्ये चौक आणि रसायनी-मोहोपाडा हा परिसर अनोळखी असतानाही या विभागात प्रचंड बहुमत मिळाले. याची परतफेड या परिसरातील सर्वसमावेशक विकासकामातून करणार आहे. यासाठी येथील मतदारांनी चारही ग्रामपंचायतींची सत्ता भाजप आघाडीला द्यावी, अशा शब्दांत विकासाचे व्हीजन आमदार महेश बालदी यांनी मांडले आहे.
चौक, लोधिवली, आसरे व तुपगाव या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून येत्या रविवारी (दि. 16) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार महेश बालदी म्हणाले की, केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. राज्यातसुद्धा भाजप युतीचे सरकार आहे. ते पाहता आपणही आपल्या गावाच्या विकासासाठी भाजपला पाठिंबा देणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडे अनेक विकासकामांसाठी प्रयत्न आणि पाठपुरावा सुरू असून चौक व परिसरात भविष्यात विकासाची गंगा वाहणार आहे. या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत, तर काही कामे पूर्ण झाली आहेत. भविष्यात स्मार्ट ग्रामपंचायती म्हणून त्या पहावयास मिळतील. पुढे बोलताना आमदार महेश बालदी यांनी सांगितले की, चौक, लोधीवली, आसरे, तुपगावमधील नागरिकांना घरोघरी फिल्टर पाणीपुरवठा होणार आहे. शुद्ध पाणी मिळण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हर घर जल मिशन राबविण्यात येणार आहे. याशिवाय सामाजिक सभागृह बांधणे, आदिवासी पाड्यांमध्ये अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, पथदिवे सुरू करणे व नवीन लावणे, चौक येथे अद्ययावत ट्रॉमा केअर सेंटर उभारणे, कचर्याची समस्या दूर करण्यासाठी घनकचरा प्रकल्प उभारणे तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ते चौक गावापर्यंत तीन हजार 500 कोटी रुपये निधीचा चार पदरी रस्ता व्हाया खारपाडा, रसायनी केंद्र शासनाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. चौक रेल्वेस्थानकाकडे जाणार्या मुंबई-पुणे महामार्गावर पूल बांधणे अशा विकासकामांना येत्या काही महिन्यातच शुभारंभ करून दोन-अडीच वर्षांत प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. मोरबे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी चौक परिसरात परिस्थिती आहे. ही समस्या मार्गी लावण्यासाठी चौक ग्रामपंचायत हद्दीत जलकुंभ उभारला जाणार आहे. त्यातून शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. हातनोली आदिवासी पाड्यांमध्ये अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणार आहे. गावातील खराब रस्ते दुरूस्त करून व अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करून ते 10 वर्षे टिकतील, असे काम करणार आहे. जांभिवली गावच्या नागरिकांना गावठाण प्लॉट वाटपाचा प्रश्न मार्गी लावणे तसेच गावठाणासाठी संपादित केलेल्या शेतकर्यांच्या जमिनींना जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. चौक ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी असणारे सध्याचे सभागृह दुरुस्त झाले असून याच ठिकाणी अतिभव्य, अलिशान व वातानुकूलित प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. तिथे एक हजार 500 आसन व्यवस्था असेल असे वातानुकूलित रंगमंच उभारण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार महेश बालदी यांनी दिली. यापूर्वी चौक ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय यंत्रसामग्री पुरविणे 34.50 लाख, ग्रामीण रुग्णालयासाठी रुग्णवाहिका 17 लाख 50 हजार, स्वामी समर्थ मठ रस्ता काँक्रीटीकरण तीन लाख, चौक पोलीस दूरक्षेत्र हायमास्ट लावणे दोन लाख, ग्रामीण रुग्णालय पत्राशेड एक लाख, गावातील तारापूर येथे सभागृह बांधणे 10 लाख, तलाव सुशोभीकरण 30 लाख अशा एकूण एक कोटी 20 रुपये खर्चाच्या कामांची पूर्तता करण्यात आली आहे, असे सांगून पुढे चौक येथे योगेश शहा ते कृष्ण चंबावडे रस्ता काँक्रीटीकरण व दुतर्फा घरे बांधणे तसेच तीन घर ते तारापूर रस्त्याच्या कडेला पेव्हर ब्लॉक बसवणे तीन कोटी 50 लाख, स. पा. काळे घरापासून ग्रामीण रुग्णालय हातमोडे, हातमोडे ते मुंबई-पुणे महामार्ग 15 लाख, हातनोली गावातील रस्ता 12 लाख, घंटागाडी 15 लाख, रस्ता काँक्रीटीकरण पाच लाख अशा चार कोटी 40 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे व लवकरच सुरुवात केली जाणार आहे, असे आमदार महेश बालदी यांनी सांगितले. चौक ग्रामपंचायत हद्दीतील चौक आदिवासीवाडी, नाणीवली ठाकूरवाडी, वरोसे आदिवासीवाडी, मोरबे आदिवासीवाडी आणि नंबराची ठाकूरवाडी येथे फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत 246 रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. या दवाखान्यात नामांकित वैद्यकीय अधिकारी, परिचारिका रुग्णांची तपासणी करीत असतात. औषधेही दिली जातात तसेच काही गंभीर आजारांवर पनवेल व आसपासच्या रुग्णालयात केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत मोफत वैद्यकीय सेवा पुरवून उपचार केले जात असून याचा फायदा गोरगरीब व आदिवासी बांधव बांधवांना मिळत आहे, असेही आमदार महेश बालदी यांनी नमूद केले.