मुंबई ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील माजी आमदार अवधूत तटकरे यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 14) मुंबईत हा पक्षप्रवेश झाला. अवधूत तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आणि माजी आमदार अनिल तटकरे यांचे पुत्र आहेत. मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार नरेंद्र मेहता आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे अवधूत तटकरे यांनी रोहा शहराचे नगराध्यक्षपद भूषविले आहे. त्यानंतर श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता, मात्र तत्कालीन ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादीला जवळ केल्यामुळे अवधूत तटकरे यांनी नाराजी व्यक्त करीत स्वार्थी राजकारणापासून चार हात दूर राहाणे पसंत केले. भाजपचे सक्षम नेतृत्व, सर्वसमावेशक विकासकार्य आणि व्यापक वाटचाल लक्षात घेऊन त्यांनी शुक्रवारी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले. अवधूत तटकरेंचा भाजप प्रवेश म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांना झटका आहे व निश्चितपणे कोकणात त्यांना रोज असे झटके बसणार आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पुढे म्हणाले की, युतीमध्ये भाजपने रायगडसह कोकणात शिवसेनेला महत्त्व दिल्यामुळे भाजपचे संघटन मजबूत झाले नव्हते. आता भाजप स्वतंत्रपणे संघटना मजबुतीने उभी करीत आहे. रायगड, पालघरसह कोकणात सर्वत्र उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोकणात सर्वत्र भाजप कार्यकर्ते उत्साहाने काम करीत आहेत.
मीरा भाईंदरचे तीन नगरसेवकही दाखल
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मीरा भाईंदरच्या चार नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यात उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नगरसेविक दिप्ती भट्ट, अनिता पाटील व कुसुम गुप्ता आणि काँग्रेसचे नगरसेवक नरेश पाटील यांचा समावेश आहे.