पनवेल : रामप्रहर वृत्त
सत्तेचा उपयोग गावाच्या आणि परिसराच्या विकासासाठी केला जातो, मात्र कर्नाळा ग्रामपंचायतीत शेकापने सत्तेचा दुरुपयोग करून विकासाऐवजी पोरखेळ केला आहे, अशी टीका माजी सरपंच राजाराम जंगम यांनी केली आहे. भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पनवेल तालुक्यातील कल्हे येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन कर्जतचे नगरसेवक नितीन सावंत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी मार्गदर्शक म्हणून जंगम बोलत होते.
या कार्यक्रमास शिवसेनेचे कल्हे शाखाप्रमुख भरत जुमलेदार, तारा शाखाप्रमुख राजेंद्र म्हात्रे, भाजपचे युवा नेते चंद्रकांत पाटील, बुथ कमिटी अध्यक्ष योगेश पाटील, रोशन पाटील, भगवान म्हात्रे, विजेंद्र जुमलेदार, संदेश खामकर, संदेश विश्वासराव, रोशन खामकर, डी. के. खामकर, मंगेश जुमलेदार, संदीप सावंत, महेश भोजने, सुनील पवार, रोहन पाटील, शशिकांत भोजने, सरपंचपदाचे उमेदवार गणेश पाटील, सदस्यपदाचे उमेदवार जगदीश जंगम, शुभांगी विश्वासराव, राम सवार यांच्यासह ज्येष्ठ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जंगम पुढे म्हणाले की, किती काळ आपण शेकापच्या दहशतीखाली राहायचे. आता बदल करण्याची वेळ आली आहे. सर्वांनी मनाशी निश्चय करा. सत्तेसाठी शेकाप साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करेल, पण आपण जागृत राहून कर्नाळा ग्रामपंचायतीवर भाजप-शिवसेना युतीचा झेंडा फडकवून विकासाची गंगा आणायची आहे. त्यासाठी सर्वांनी सतर्क राहून काम केले पाहिजे. नगरसेवक नितीन सावंत यांनीही मार्गदर्शन केले.