लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे गौरवोद्गार; कामोठ्याचा महोत्सव 2022चे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
परिसर एकरूप करण्याचे काम हा महोत्सव करीत आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आगरी-कराडी महोत्सवाच्या उद्घाटनावेळी शुक्रवारी (दि. 4) केले. कै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय झेंडा सामाजिक संस्था कामोठे यांच्या वतीने आगरी-कराडी कामोठ्याचा महोत्सव 2022चे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, रोहिदास ठाकूर, समाजसेवक राजेश म्हात्रे, भाऊ भगत, कामोठे सरचिटणीस शरद जगताप, भटके विमुक्त आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा विद्या तामखेडे, कामोठे शहर महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, विनोद भगत, संतोष गायकर, नारायण सोनावणे, संस्थापक अशोक राघो पावणेकर, अॅड. जय पावणेकर यांच्यासह कै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय झेंडा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यंदाचे हे या महोत्सवाचे 11वे वर्ष असून हा महोत्सव 4 ते 13 नोव्हेंबर या दरम्यान कामोठे सेक्टर 11 येथील सोनारी मैदानात सुरू आहे. या महोत्सवात सोलो डान्स स्पर्धा, गुलजार गुलछडी लावणी, कामोठे आयडॉल, हभप. चंद्रकांत महाराज खळेकर यांचे कीर्तन, मिस कामोठे, ग्रुप डान्स स्पर्धा, कामोठे महोत्सव श्री, दर्यासागराचा राजा, गौरव महाराष्ट्राचा यांसह अनेक बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद कामोठेकरांना घेता येणार आहे.